Join us

Micro Irrigation Subsidy : कर्ज काढून साहित्य खरेदी, अजून सूक्ष्म सिंचन अनुदान मिळालेच नाही, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 2:23 PM

Micro Irrigation Subsidy : खरेदी झालेल्या सूक्ष्म सिंचनाचे साहित्याची अनुदानित रक्कम (Irrigation Subsidy) अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही.

यवतमाळ : सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून समृद्धी साधण्यासाठी प्रत्येक शेतकरी तयार आहे. मात्र, या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे मिळणारे अनुदान दुरापास्त झाले आहे. सूक्ष्म सिंचनाचे (Micro Irrigation) साहित्य खरेदी केल्यानंतर कृषी विभागाकडून पाहणी झाली. मात्र, खरेदी झालेल्या साहित्याची अनुदानित रक्कम (Irrigation subsidy) अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. परिणामी हजारो शेतकरी कृषी विभागाच्या येरझारा मारत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal District) जलप्रकल्पांतून होणारे सिंचन अपुरे आहे. यामुळे शेतातील सिंचनासाठी जिल्ह्यातील शेतकरी केवळ विहिरीवरच्या सिंचनावर अवलंबून आहे. या ठिकाणावरून ओलीत करताना शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी पुरत नाही. यासाठी सूक्ष्म सिंचन हा योग्य पर्याय आहे. त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना कळत आहे. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनासाठी अर्ज केले आहे. महाडीबीटी पोर्टलवर सूक्ष्म सिंचनसाठी हजारो अर्ज आहे. यातील निवडक अर्जाना लॉटरी पद्धतीने मंजुरी मिळाली. यामुळे शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचे साहित्य खरेदी केले.

या खरेदी झालेल्या साहित्याची कृषी विभागाकडून पाहणी झाली. मात्र, खरेदी झालेल्या साहित्याची अनुदानित रक्कम अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. यातून शेतकरी चांगलेच आर्थिक अडचणीत आले आहेत. लॉटरी पद्धतीने सूक्ष्म सिंचनासाठी मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढले होते. दोन महिन्यांच्या कालावधीत पैसे मिळतील, या आश्वासनावर हे पैसे घेण्यात आले. प्रत्यक्षात सावकार आता पैसे परत मागत आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडे अनुदानाची रक्कमच नाही. यातून शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

असे आहेत प्रलंबित लाभार्थीसर्वसाधारण गटातील पाच हजार ९३० लाभार्थ्यांना ११ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. अनुसूचित जातीच्या १२६ लाभार्थ्यांना ३६ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. सहा हजार १३१ लाभार्थ्यांना ११ कोटी ८६ लाख २४ हजार रुपयांची नितांत आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव कृषी विभागाने पाठविला आहे. मात्र, अजूनही त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. अनुदानाच्या भरोश्यावरच शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली होती.

कृषिमंत्र्यांच्या बैठकीने अपेक्षा वाढल्यायासंदर्भात राज्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक पार पाडली. तत्काळ पैसे वळते होतील असे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र, अजूनपर्यंत हा निधी मिळालाच नाही. तर याबाबत शेतकरी उत्तम बुटले म्हणाले की, सूक्ष्म सिंचनाचा निधी न मिळाल्याने अडचणी वाढल्या आहे. प्रत्येक वेळी पैसे आलेच नाही, असेच उत्तर मिळते. यामुळे शेतकरी वैतागले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा.

टॅग्स :पाटबंधारे प्रकल्पशेतीशेती क्षेत्रयवतमाळ