नाशिक : येवला तालुक्यातील (Yeola) राजापूर- ममदापूर राखीव वन संवर्धन क्षेत्रामध्ये नाशिक (Nashik) पूर्व वनविभाग प्रादेशिक यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रामधील पहिली गवती रोपवाटिका साकारण्यात यश आले असून, येथील गवती रोपांचा (Grass Nursery) नाशिकसह नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, पुणे, जळगाव, मालेगाव या ठिकाणी पुरवठा केला जात आहे.
राजापूर-ममदापूर राखीव व संवर्धन क्षेत्रालगत वडपाटी पाझर तलावाजवळ वन विभागाची ही रोपवाटिका असून, याठिकाणी चार ते पाच लाख गवती रोपे व वीस ते पंचवीस लाख गवती ठोंब रोपे उपलब्ध आहेत. यामध्ये मद्रास, अंजन, मारवेल, धामण, डोंगरी, हेमाटा, दशरथ व इतर बहुवार्षिक गवताच्या जाती बघायला मिळतात. नाशिक पूर्व विभाग उपवनसंरक्षक उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वन परिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे, राजापूरचे वनपाल भाऊसाहेब माळी, ममदापूरचे वनरक्षक गोपाल हरगावकर, गोपाल राठोड, पंकज नागपुरे, वन सेवक आप्पा वाघ, रामनाथ भोरकडे, दत्तू गोसावी, मनोहर दाने, सोमनाथ ठाकरे, मच्छिंद्र ठाकरे व येवला वनमजूर या रोपवाटिकेकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.
राजापूर ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रात हरीण, काळवीट, नीलगाय, रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांसाठी ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे व गवती लागवड झालेली असल्याने त्यांचे कळप या क्षेत्रामध्ये पाहण्यास मिळतात. या जंगलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. येवला वनक्षेत्रात आतापर्यंत सुमारे दोनशे हेक्टरवर गवती रोप लागवड झालेली आहे, तर अजूनही उर्वरित क्षेत्रात गवती लागवड होणार असल्याची माहिती येवला वनपरिक्षेत्रचे अधिकारी अक्षय म्हेत्रे यांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली गवती रोपवाटिका ही फक्त नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रात यशस्वी झाली आहे. या गवती रोपांना लागवडीसाठी तयार केली आहेत. गवती रोपे तयार करून ती लागवडीसाठी येईपर्यंत विशेष लक्ष द्यावे लागते.
- अक्षय म्हेत्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी