Join us

‘कृषी विज्ञान केंद्र आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ मोहिमेला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 8:13 PM

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. देवराव देवसरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरूवात झाली.

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, खामगाव यांच्या माध्यमातून त ‘कृषी विज्ञान केंद्र आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ या शेतीविषयक मोहिमेला मौजे बोरी पिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड या गावातून २१ ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. देवराव देवसरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरूवात झाली. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, खामगावच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर, उद्यानविद्या विषय विशेषज्ञ प्रा. गणेश मंडलिक, केंद्राचे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण ) डॉ. श्रीकृष्ण झगडे, बोरी पिंपळगावच्या महिला सरपंच गंगा पवार, सिंदफणा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अशोक पठाडे, अध्यक्ष  किशोर ओटी यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

या प्रसंगी डॉक्टर देवसरकर यांनी मोसंबी या बागेत भेट देऊन बागेची स्वच्छता, खताचे नियोजन कीड व रोगाचे व्यवस्थापन अंतर मशागतीचे कामे इत्यादी बाबी वर मार्गदर्शन केले.  तसेच शेतकऱ्यांनी स्वतःचे बियाणे स्वतः उत्पादित करावे, सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा व विद्यापीठ तंत्रज्ञान व कृषी विज्ञान केंद्र च्या मार्गदर्शनाखाली  शाश्वत शेती करण्याचे आवाहन केले.

मोसंबी पिकातील फळगळ व्यवस्थापन याबाबत प्रा. गणेश मंडलिक यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात आले.  तसेच मोसंबी, कापूस सोयाबीन पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याबाबत डॉक्टर झगडे यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात आले. सदरील मोहीम अंतर्गत मौजे बोरी पिंपळगाव व  उमापूर येथील ५५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. प्रास्ताविक केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केले.

ही मोहीम गेवराई, बीड, पाटोदा, आष्टी, शिरूर कासार तालुक्यात कृषी विभाग व केव्हीके यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केले आहे.

टॅग्स :शेतकरीशेतीखरीप