Join us

Leopard Awareness : बिबट्या फिरतोय शिवारात; शेतकऱ्यांनो 'ही' घ्या खबरदारी ! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:11 PM

मागील काही महिन्यांपासून विविध भागांतील शिवारात बिबट्याचा संचार वाढल्याचे दिसत आहे. त्यासाठी वन विभागाने काय उपाययोजना सांगितल्या आहेत. वाचा सविस्तर (Leopard Awareness)

Leopard Awareness : 

वाशिम जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून विविध भागांतील शिवारात बिबट्याचा संचार वाढल्याचे दिसत आहे.  मागील आठवडाभरात मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम, तपोवननंतर मालेगाव तालुक्यातील आमखेडा शिवारातही बिबट्याच्या संचाराची चिन्हे दिसली आहेत.

या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजुरांसह ग्रामस्थांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत खरीप हंगाम निम्म्यावर आला आहे. सोयाबीनचे पीक शेंगावर असून, तुरीचे पीक चांगलेच जोमदार झाले आहे.

 खरीप हंगामातील पिकांत वाढलेले तण तसेच सोयाबीन, कपाशीवरील रोग नियंत्रणाची कामे शेतकरी करीत आहेत. अशातच शिवारात बिबट्याच्या संचाराची चिन्हे दिसत आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे सोमवारी ग्रामस्थांना शिवारात बिबट्या फिरत असल्याचे दिसले. 

त्यानंतर गुरुवारी मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन शिवारात काही शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन घडले, तर शनिवारी मालेगाव तालुक्यातील आमखेडा शिवारातही बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या.  या पार्श्वभूमीवर वनविभागाने शेतकरी, शेतमजुरांसह ग्रामस्थांना आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

हे करू नका !

बिबट्या रात्री जास्त सक्रिय असतो. त्यामुळे रात्री एकट्याने बाहेर पडणे टाळा.

• रात्रीच्या वेळी दरवाजे व्यवस्थितरीत्या कुलूप लावून बंद करा, तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर झोपणे टाळा.

• रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना एकटे सोडू नका. 

• बिबट्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. त्याला डिवचण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका.

• घराच्या आसपास झाडेझुडुपे ठेवू नका

हे करा उपाय !

• पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवा.

• रात्री एकटे फिरताना जवळ टॉर्च व काठी बाळगा. मोठ्याने म्युझिक लावा.

• घरापासून थोडे लांब सुरक्षित अंतरावर पीक लावा. घराजवळ रात्रीच्या वेळी मोठे लाइट लावा.

• घरातल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा. न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि बिबट्या त्यांकडे आकर्षित होतो.

• अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा.  

• १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा किंवा तत्काळ वनविभागाला कळवा.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबिबट्याअकोला