देशातील बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली असून संख्या सुमारे १३ हजार ८७४ पर्यंत गेली आहे. मध्य भारतात बिबट्यांची संख्या स्थिर किंवा किंचीत वाढती असली तरी गंगेच्या मैदानात तसेच शेवालीक टेकड्यांच्या परिसरात बिबट्यांचा अधिवास घटल्याचे केंद्र सरकारच्या भारतातील बिबट्यांच्या स्थितीवरील अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आज केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथे हा अहवाल प्रसिद्ध केला. भारतातून २०१८ आणि २०२२ मध्ये घेतलेल्या नमुन्यांनुसार बिबट्यांची झालेली वार्षिक वाढ १.०८ टक्के आहे. या अहवालातील बिबट्यांच्या संख्येचा हा अंदाज देशातील बिबट्यांच्या ७० टक्के अधिवासाचे प्रतिनिधीत्व करतो. हिमालय व देशातील अर्धशुष्क भागांमधील व्याघ्र व संबंधित अधिवासाचे नमूने घेण्यात आले नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
देशात सर्वात अधिक बिबट्या कुठे?
देशात बिबट्यांची सर्वाधिक संख्या मध्य प्रदेशात आहे. त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडूमध्ये बिबट्यांची संख्या आढळते. मध्यप्रदेशात बिबट्यांची संख्या २०१८ मध्ये ३ हजार ४२१ एवढी होती, जी आता वाढून ३ हजार ९०७ एवढी झाली आहे. भारत राज्यांमधील वन अधिवासांवर केंद्रित करत आहे. ज्यामध्ये प्रमुख चार प्रमुख व्याघ्र संवर्धन भूदृष्यांचा समावेश आहे.
जगभरात बिबट्या, वाघांसह अनेक वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात येत असताना अशा प्राण्यांचे संवर्धन करण्यावर सरकारचे लक्ष आहे. हे करण्यसाठी सर्वसमावेशक सर्वेक्षणामध्ये बिबट्याच्या विपुलतेचे मूल्यांकन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मजबूत वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यात आला.
कॅमेरा ट्रॅपिंग, अधिवास विश्लेषण आणि लोकसंख्येचे मॉडेलिंग एकत्रित करण्याच्या सूक्ष्म प्रक्रियेद्वारे, अभ्यासाने बिबट्याचे वितरण आणि संवर्धन आव्हानांमध्ये महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी प्रकट केली.