Join us

पाऊस नसल्यानं उतारा कमी; ऊसाचे १२ लाख टन उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2023 11:14 AM

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. यावेळी २५ किमी हवाई अंतराची अट रद्द करण्याचा ठराव मंजूर करून तो मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

पुरेसा पाऊस नसल्याने साखर उतारा घटून चालू हंगामात सुमारे १२ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन कमी होऊ शकते. पुणे येथे साखर आयुक्तालयात झालेल्या ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत दोन साखर कारखान्यांमधील २५ किमी हवाई अंतराची अट रद्द करण्यात यावी अशी भूमिका ऊस दर नियंत्रण मंडळाने घेतल्याचे मंडळाचे सदस्य प्रा. सुहास पाटील यांनी सांगितले.

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. यावेळी २५ किमी हवाई अंतराची अट रद्द करण्याचा ठराव मंजूर करून तो मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीसाठी साखर संचालक (अर्थ) चे यशवंत गिरी, सहसंचालक (अर्थ) राजेश सुरवसे, विशेष लेखापरीक्षक साखर पुणे पांडुरंग मोहोळकर, विशेष लेखापरीक्षक सातारा अजय देशमुख, सहायक संचालक (अर्थ) बी एल साबळे, कार्यकारी संचालक राज्य सहकारी साखर संघ मुंबईचे संजय खताळ, कार्यकारी संचालक वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अजित चौगुले आदी उपस्थित होते.

या बैठकीत साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाइन व डिजिटल करण्यात यावेत. गेल्या ऊस हंगामातील एफआरपी अद्याप ज्या कारखान्यांनी दिलेली नाही. त्या कारखान्यांवर पंधरा दिवसात आरआरसीची कार्यवाही करून शेतकऱ्यांचे व्याजासहित ऊस बिल देण्यासंबंधीचा ठराव ही मंजूर करण्यात आला. या बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी म्हणून प्रा. सुहास पाटील (सोलापूर), सचिन नलावडे (सातारा), पृथ्वीराज जाचक (पुणे), धनंजय भोसले (लातूर), योगेश बरडे (नाशिक), कारखाना प्रतिनिधी कैलास तांबे (अहमदनगर), दामोदर नवपुते (संभाजीनगर) व आनंदराव राऊत (नागपूर) उपस्थित होते.

मुकादम अन् कामगारांची महामंडळाकडे नोंद करावीऊस तोडणी मुकादमाकडून एकाच वेळी अनेक कारखान्यांचे ऊस तोडणी संदर्भात करार केले जातात. त्यासाठी ऊस तोडणी मुकादम व कामगारांची महामंडळाकडे नोंद करण्यात यावी. ऊस वाहतूकदारांना संरक्षण देण्यात यावे. सन २०१६-१७ पासून आरएसएफ व एफआरपी मूल्य यातील तफावतीचे पैसे अद्यापपर्यंत ज्या कारखान्यांनी दिलेले नाहीत. त्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करून १५ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना देण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आल्याचे सुहास पाटील म्हणाले.

राज्याची प्रतिदिन ऊस गाळप क्षमता ८ लाख ८२ हजार ५५० टन एवढी आहे. त्यानुसार गेल्या हंगामात राज्यातील २२ जिल्ह्यातील कारखान्यांकडून १०५२ लाख टन उसाचे गाळप झाले होते. मात्र चालू वर्षी ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. अद्यापपर्यंत १४ लाख ३७ हजार हेक्टर ऊस लागवड करण्यात आली आहे. पुरेसा पाऊस नसल्याने साखर उतारा घटणार आहे. त्यामुळे यंदा सुमारे १२ लाख टनाने साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. - डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :ऊससाखर कारखानेराज्य सरकारसरकारपीकपुणेपाऊसमुंबई