भारत हा कृषि प्रधान देश आहे.भारताची अर्थव्यवस्था ही कृषि क्षेत्रावर आधारित आहे. साहजिकच भारतीय समाजजीवनात शेतीला पर्यायाने शेतकऱ्यांना अनन्य साधारण महत्व आहे.भारतात कृषि संस्कृती ही पारंपारिक असली तरी स्वातंत्र्यानंतर झालेल्या हरितक्रांती मुळे भारतात आधुनिक शेतीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. आज जगात भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो आणि विशेष म्हणजे या लोक संख्येला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याबाबत भारत स्वंयपूर्ण आहे. यावरून भारतीय संस्कृतीत शेतीचे महत्व विषद होते. परंतु असे असले तरीही दुसरीकडे मात्र पिकाच्या अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी भारतीय शेतीचे आरोग्य बिघडत चालले असल्याचे चित्र सामोरे येत आहे.
सधन कृषि पद्धतीत रासायनिक खतांच्या अनिर्बंधित वापरामुळे तसेच तदनुषंगिक कारणामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी माती तपासणी आधारित खतांच्या परिणामकारक वापरास महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी शेतीबाबत पर्यायाने मातीच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने मातीच्या निरोगी आरोग्याचे गांभीर्य ओळखून केद्र शासनाने देशभरात मृद आरोग्यपात्रिका अभियान राबवण्याचा निर्णय घेतला असून या अभियानांतर्गत जिरायती व बागायती जमिनीचा म्हणजेच मातीचा सामू व क्षारता, मातीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश, सूक्ष्म मूलद्रव्ये, जसे जस्त, तांबे, लोह, मंगल आदी घटक तपासून शेतकऱ्यांना मृदा आरोग्य संवर्धनासाठी योग्य त्या उपाय योजनांचे मार्गदर्शन केले जात आहे.
शाश्वत शेती व्यवस्थापनामध्ये जमिनीचे आरोग्य अबाधित राखून किफायतशीर पीक उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असते. दर वर्षी पीक घेतल्यामुळे पिकांच्या शोषणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत असतो त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते. जमिनीची सुपिकता आजमाविण्यासाठी भैातिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची तपासणी करणे आवश्यक असते.त्यासाठी माती परीक्षणाची गरज आहे. माती परीक्षणामुळे जमिनीच्या सर्व गुणधर्माची माहिती मिळते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते आणि त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा व शिफारशी ठरविणे सुलभ होते.
माती आणि पाणी ही पिकांची संजीवनी आहे.पिकांचे अस्तित्व मातीच्या आणि पाण्याच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. पीक उत्पादनातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जमिन कालांतरापासून शेतकरी जमिनीत विविध पिके घेत आला आहे. पूर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ जमिनीत साचण्याचे प्रमाण जास्त होते.साहजिकच जमिनीचा पोत टिकण्यास आपोआपच मदत होत असे.अन्नधान्याची गरज जसजशी वाढू लागली तसा जमिनीतून अधिकाधिक उत्पादन काढण्याकडे कल वाढत गेला.त्यासाठी प्रगत व उच्च तंत्रज्ञानावर आधरित शेतीसाठी अधिक भांडवल गुंतवावे लागत असल्याने याठिकाणी माती व पाणी परिक्षणाचे महत्व अनन्य साधारण झालेले आहे.
महाराष्ट्रातील मातीच्या आरोग्याबाबत सद्य स्थिती
- सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी (सर्व जिल्हे)
- नत्राचे प्रमाण कमी (१० जिल्हे)
- स्फुरदाचे प्रमाण कमी (२३ जिल्हे)
- पालाशचे प्रमाण अधिक (सर्व जिल्हे)
- लोहाचे प्रमाण कमी (२३ जिल्हे)
- जस्ताचे प्रमाण सर्वात कमी (२८ जिल्हे)
माती परिक्षणावर आधारित खत व्यवस्थापन केल्याने खतांच्या मात्रेत बचत तर होतेच परंतु जमिनीचे स्वास्थ टिकवण्यासाठी सुध्दा मदत होते. जमिनीच्या स्वास्थ्याविषयक समस्यांचे निदान व त्यावरील उपाययोजना याबाबतचे नियोजन हे या माती व पाणी परिक्षणावरच आधरित असते. जमिनीच्या नियोजनासाठी माती परिक्षणाबरोबर, मृद सर्वेक्षणामुळे जमिनीची उत्पत्ती, तिचे गुणधर्म काय आहे हे समजते. मृद सर्वेक्षणामुळे जमिनीच्या समस्या व प्रमाण याची माहिती मिळते अशा समस्या दूर करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत याचे नियोजन व व्यवस्थापन मृद सर्वेक्षणाच्या आधारे करता येते.
राज्यात कृषि विभागाने माती परीक्षणाची सोय सर्व जिल्ह्यांची मुख्यालयी केलेले आहे. याशिवाय कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे, साखर कारखाने रासायनिक खत उत्पादन संस्था व खाजगी संस्थांद्वारे माती परिक्षण प्रयोगशाळा राज्यात सर्वत्र उपलब्ध आहे. जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वाटप होत आहे. शेतकरी बंधुनो या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो की हंगामापूर्वी तसेच नवीन फळबागा पिकांचे नियोजन करताना माती परिक्षण करूनच खतांचे व्यवस्थापन करावे व आपली लाख मोलाची जमिन चिरकाल, चिरंजीवी व शाश्वत ठेवावी.अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्न या दोघांमध्ये संतुलन साधण्यासाठी मातीचे आरोग्य जपावे.
डॉ. आदिनाथ ताकटे
मृदशास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी