LIC Bima Sakhi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ डिसेंबर रोजी हरियाणाच्या पानीपतमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या विमा सखी योजनेची घोषणा केली. भारतात महिला सशक्तीकरणसाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. सरकारने मागील १० वर्षात महिला सशक्तीकरणासाठी अभूतपूर्व निर्णय घेतले आहेत.
हरियाणाच्या पानीपतमध्ये विमा सखी योजनेचा शुभारंभ करून अत्यंत आनंद होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पीएम मोदी यांनी पुढे असे सांगितले की, विमा सखी योजना सुरु करतानाच काही महिलांना नियुक्ती पत्रही देण्यात येत आहेत.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना एलआयसी एजेंट बनण्यासाठी ट्रेनिंग दिले जाणार आहे. याचदरम्यान त्यांना दरमहा ५ ते ७ हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय कमिशनही देण्यात येणार आहे.
कोण करू शकतो अर्ज?
विमा सखी योजना फक्त महिलांसाठी आहे. या योजनेसाठी अर्ज करताना कमीत कमी १० वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्याबरोबर १८ ते ७० वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
एलआयसी एजंट ते डेव्हलोपमेंट ऑफिसर मिळणार संधी
ट्रेनिंगनंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात आणि पदवीधर विमा सख्यांना (महिलांना) एलआयसीमध्ये डेव्हलोपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळेल.
३ वर्षांसाठी मिळेल स्पेशल ट्रेनिंग
या योजनेच्या माध्यमातून फायनेंशियल लिटरेसी आणि विमा जागरुकता वाढवण्यासाठी महिलांना आधी ३ वर्षांसाठी स्पेशल ट्रेनिंग आणि आर्थिक सहाय्य दिले जाईल. या योजनेच्या सुरुवातीला महिलांना दरमहा ७ हजार रुपये दिले जाणार आहेत. तर दुसऱ्या वर्षी ही रक्कम ६ हजार केली जाणार आहे. तर तिसऱ्या वर्षी ही रक्कम ५ हजार रुपये असणार आहे. याप्रमाणे महिलांना पहिल्या वर्षी ८४ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ७२ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी ६० हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय विमा सख्यांना (महिलांना) वेगळे कमिशनही मिळणार आहे. त्यामुळे आता महिलांना स्वत: च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळणार आहे.