Lokmat Agro >शेतशिवार > ऊसातील हुमणीचा जीवनक्रम आणि नियंत्रण

ऊसातील हुमणीचा जीवनक्रम आणि नियंत्रण

Life cycle and control of white grub in sugarcane | ऊसातील हुमणीचा जीवनक्रम आणि नियंत्रण

ऊसातील हुमणीचा जीवनक्रम आणि नियंत्रण

हुमणीच्या नियंत्रणासाठी शेतकरी हुमणीचा जीवनक्रम समजून न घेता रासायनिक कीटकनाशकांचा अवेळी असंतुलित प्रमाणात वापर करत आहेत. यामुळे हुमणी किडीचे नियंत्रण परिणामकारक होत नाही म्हणून हुमणीचे एकात्मिक नियंत्रण सामुदायिक मोहिम राबवून करणे आवश्यक आहे.

हुमणीच्या नियंत्रणासाठी शेतकरी हुमणीचा जीवनक्रम समजून न घेता रासायनिक कीटकनाशकांचा अवेळी असंतुलित प्रमाणात वापर करत आहेत. यामुळे हुमणी किडीचे नियंत्रण परिणामकारक होत नाही म्हणून हुमणीचे एकात्मिक नियंत्रण सामुदायिक मोहिम राबवून करणे आवश्यक आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अवर्षण परिस्थिती, पाण्याचा ताण, हवामानातील बदल, जैविक निविष्ठांचा कमी वापर आणि रासायनिक कीटक नाशकांचा बेसुमार वापर या प्रमुख कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये मागील १४-१५ वर्षात ऊस पिकामध्ये हुमणी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. भारतात हुमणीच्या साधारणपणे ३०० प्रजातींची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात प्रमुख दोन प्रकारच्या हुमणी आढळतात. त्यास नदीकाठावरील (लिकोफोलीस) आणि माळावरील (होलोट्रॅकिया) असे संबोधले जाते. तसेच मागील ४-५ वर्षात नवीन दोन प्रकारच्या हुमणी प्रजाती (फायलोपॅथस आणि अॅडोरेटस) आढळल्या आहेत. सध्या एप्रिल २०१९ पासून हुमणीच्या विविध प्रजातींचे भुंगेरे (होलोट्रॅकिया, फायलोपॅथस आणि अॅडोरेटस व इतर) सापडत आहेत. पुणे जिल्ह्यात ऊस पिकामध्ये प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या दिसून येत आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात अळीच्या तीनही अवस्था सापडत आहेत व हुमणीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ही ऊस पिकासाठी धोक्याची घंटा आहे. हुमणीच्या नियंत्रणासाठी शेतकरी हुमणीचा जीवनक्रम समजून न घेता रासायनिक कीटकनाशकांचा अवेळी असंतुलित प्रमाणात वापर करत आहेत. यामुळे हुमणी किडीचे नियंत्रण परिणामकारक होत नाही म्हणून हुमणीचे एकात्मिक नियंत्रण सामुदायिक मोहिम राबवून करणे आवश्यक आहे.

नुकसानीचा प्रकार
प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर किंवा जिवंत मुळे मिळाल्यास ती मुळ्यांवरच उपजीविका करतात. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस व इतर पिकांची मुळे जून-ऑक्टोबर महिन्यात खातात. मुळे खाल्ल्यामुळे पिकाचे अन्न व पाणी घेण्याचे कार्यच बंद पडते. प्रादुर्भावग्रस्त ऊस निस्तेज दिसतो व पाने मरगळतात. पाने हळूहळू पिवळी पडण्यास सुरूवात हाते व वीस दिवसात पूर्णपणे वाळतात. ऊसाची मुळे कुरतडल्यामुळे संपूर्ण ऊस वाळतो आणि वाळक्या काठीसारखा दिसतो. एका उसाच्या बेटाखाली जास्तीतजास्त २० पर्यंत अळ्या आढळतात.

एक ऊसाचे बेट एक अळी तीन महिन्यात तर दोन किंवा जास्त अळ्या एक महिन्यात मुळ्या कुरतडून कोरडे करतात. जमिनी खालील ऊसाच्या कांड्यांनाही अळी उपद्रव करते. प्रादुर्भावग्रस्त उसाला हलकासा झटका दिल्यास ऊस सहजासहजी उपटून येतो. होलोट्रॅकियाच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उगवणीत ४०% पर्यंत नुकसान होते. अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास १००% पर्यंत नुकसान होते. हेक्टरी २५,००० ते ५०,००० अळ्या आढळल्यास साधारणपणे १५ ते २० टनापर्यंत नुकसान होते. हुमणीची १२ महिन्यात एकच पिढी तयार होत असली तरी अळीचा जास्त दिवसांचा कालावधी आणि पिकाच्या मुळांवर उपजीविका करण्याची क्षमता यामुळे पिकाचे जास्त प्रमाणात नुकसान होते.

आर्थिक नुकसानीची संकेत पातळी
एक हुमणीची अळी प्रति एक घनमीटर अंतरात आढळून आल्यास कीड नियंत्रण सुरू करावे. हुमणीग्रस्त शेतात पावसाळ्यात कडूनिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खाल्लेली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.

हुमणीचा जीवनक्रम
(होलोट्रॅकिया): 
हुमणीच्या नियंत्रणासाठी हुमणीचा जीवानक्रम व या किडीच्या वेगवेगळ्या अवस्थांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. हुमणीची अळी अवस्था ही ऊस पिकास नुकसानकारक आहे. हुमणी किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व भुंगेरे या चार अवस्थेत पूर्ण होतो. अशाप्रकारे एका वर्षात या किडीचा एक जीवनक्रम पूर्ण होतो.
१) अंडी :
एक मादी जमिनीत १० सें.मी. खोलीवर सरासरी ६० अंडी घालते. अंड्यातून १० ते १५ दिवसात अळी बाहेर येते. अंडी घालण्याचा कालावधी पावसाळा सुरू होताच म्हणजे जूनच्या मध्यास असतो. प्रथम अंडे मटकीच्या किंवा ज्वारीच्या आकाराचे, लांबट गोल आकाराचे, दुधी पांढरे असते. त्यानंतर ते तांबूस व गोलाकार होते.
२) अळी :
नुकतीच अंड्यातून बाहेर आलेली अळी दह्यासारख्या पांढरट रंगाची असते. ही अळी तीन रूपांतर अवस्थांतून जाते. अळीची प्रथमावस्था २५ ते ३० दिवस, द्वितीयावस्था ३० ते ४५ दिवस व तृतीयावस्था १४० ते १४५ दिवस असते. मुळावर पूर्ण वाढ झालेली अळी पांढरट पिवळी, इंग्रजी 'सी' आकाराची असते. डोके पिवळसर तांबूस ते गडद तांबूस व जबडा मजबूत असतो. अळी अवस्था १५० ते २१० दिवसाची असते. जमिनीत अळी नेहमी साधारणपणे अर्धगोलाकारात पडून राहते. पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी मातीच्या घरात कोषावस्थेत जाते. साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी या थंडीच्या महिन्यात त्या जमिनीत ९० ते १२० सें.मी. खोलवर कोष तयार करतात. साधारणपणे १० ते १५ सें.मी. खोलीपर्यंत अळी सापडते. एका दिवसात पडीक जमिनीत अळी २४ सेंटीमीटर पर्यंत अंतर सरळ रेषेत जाते.
३) कोष :
अळीपासून झालेला कोष पांढरट रंगाचा असतो व तो नंतर लालसर होत जातो. कोषावस्था २० ते २४ दिवसांची असते. शेतात कोषावस्था प्रामुख्याने ऑगस्ट ते मार्च पर्यंत आढळते. स्वरक्षणासाठी ही कीड मातीमध्ये कोषाभोवती मातीचे टणक आवरण तयार करते.
४) भुंगेरा :
कोषावस्थेतून बाहेर आलेला भुंगेरा पुरेसा पाऊस पडेपर्यंत (४ ते ५ महिने) जमिनीत मातीच्या घरातच काही न खाता पडून राहतो. यालाच भुंग्याची सुप्तावस्था (क्वीझंट स्टेज) असे म्हणतात. भुंगेरे विटकरी अथवा काळपट रंगाचे असतात. मादी भुंगेऱ्यात मिशीच्या टोकाची गाठ नर भुंगेऱ्यापेक्षा लांब असते. नोव्हेंबर महिन्यापासून भुंगेरे जमिनीत तयार होतात. भुंगेरे पहिला पाऊस पडल्यानंतर (एप्रिल-जून) जमिनीतून बाहेर पडतात किंवा हवामान ढगाळ असल्यास संध्याकाळी ७.२० ते ७.५० च्या दरम्यान जमिनीतून बाहेर पडतात. बाहेर पडण्याची क्रिया ९.०० वाजेपर्यंतही आढळते. सर्व भुंगेरे १० १५ मिनिटात बाहेर पडतात. भुंगेरे बाहेर पडल्यानंतर उडताना घुऽ घुड आवाज करतात. जमिनीतून बाहेर आल्यानंतर नर व मादी भुंगेरे यांचे मीलन होते. नर व मादीचे मीलन साधारणपणे ४ ते १५ मिनीटांपर्यत चालते. नंतर ते कडूनिंब, बोर, बाभूळ इ पाने खात असतात. पाने खाल्ल्यामुळे उरलेला पानाचा भाग चंद्राकृती दिसतो. भुंगेरे सुर्योदयापूर्वी म्हणजे ५.४० ते ६.०० वाजेपर्यंत जमिनीत जातात. भुंगेरे निशाचर असतात. मादी भुंगेरे साधारणपणे ९३ ते १०९ दिवस जगतात व मिलनानंतर नर लगेच मरतो.

यजमान वनस्पती
हुमणी ही बहुभक्षीय कीड आहे. हुमणीचे भुंगेरे प्रामुख्याने कडूनिंब, बाभुळीची पाने खाऊन जगतात. त्या व्यतिरिक्त ते बोर, पिंपळ, गुलमोहोर, शेवगा, पळस, चिंच अशा निरनिराळ्या ५६ वनस्पतींवर उपजीविका करतात. हुमणीची अळी साधारणपणे ऊस, भुईमुग, हरभरा, सोयाबीन, ज्वारी, आले, तृणधान्ये, कडधान्ये, भाजीपाला, तेलबिया व फळवर्गीय अशा सर्वच पिकाच्या मुळावर उपजीविका करते.

एकात्मिक नियंत्रण
हुमणीच्या नियंत्रणासाठी कोणताही एक उपाय योजून किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण होत नाही. त्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन आवश्यक आहे. हुमणी कीडीच्या जीवनक्रमाच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात. त्याला एकच अपवाद म्हणजे पावसाळ्याच्या सुरूवातीला सूर्यास्तानंतर मीलनासाठी व खाण्यासाठी बाभळीच्या किंवा कडूनिंबाच्या झाडावर जमा होणारे भुंगेरे हे होत. म्हणून प्रथम 'भुंगेरे' व नंतर 'अळी' हेच लक्ष्य बनवून जर एकात्मिक कीड व्यवस्थापन तत्वाचा अवलंब सामुदायिक मोहिम राबवून केला तर हुमणी आटोक्यात येते. हुमणी नियंत्रणाचे उपाय योग्य वेळीच योजणे अत्यंत महत्वाचे आहे. ही वेळ टळल्यास नियंत्रण उपायाचा हवा तसा परिणाम होत नाही.
१) मशागत
-
नांगरणी : ऊस लागवडी अगोदर एप्रिल-मे किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात शेत २ ते ३ वेळा उभे आडवे खोलवर नांगरावे. नांगरणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी. त्यावेळी पक्षी व प्राणी मातीच्या वर आलेल्या अळ्या, कोष व भुंगेरे खातात.
- ढेकळे फोडणे : शेतातील ढेकळे फोडावीत. मातीचे ठेकूळ मोठे राहिल्यास त्यात हुमणीच्या निरनिराळ्या अवस्था (अंडी, अळी, कोष) राहण्याची शक्यता असते. त्यासाठी तव्याचा कुळव (Disc Harrow) किंवा रोटाव्हेटर वापरून ढेकळे फोडावीत.
- पीक फेरपालट : उसाच्या तोडणीनंतर अति प्रादुर्भावग्रस्त शेतात उसाचा खोडवा न घेता सूर्यफुलाचे पीक घ्यावे व सूर्यफुल काढणीनंतर शेताची ३-४ वेळा नांगरट करावी. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जास्त पावसाच्या भागात भात हे फेरपालटीचे पिक घ्यावे.
- सापळा पीक : भुईमूग अथवा ताग पिकाचा हुमणीग्रस्त शेतात सापळा पीक म्हणून वापर करावा. उसाची उगवण झाल्यानंतर सऱ्यांमध्ये ठिकठिकाणी भुईमूग अथवा ताग लावावा. कोमेजलेल्या भुईमुग अथवा तागाखालील अळ्या माराव्यात.
- अळ्या मारणे : शेतात कोणतेही मशागतीचे काम (उभ्या उसात खुरपणी, तगरणी अथवा बांधणी) करताना जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या गोळा करून माराव्यात.
- प्रौढ भुंगेरे गोळा करून मारणे : वळवाचा (पहिला) पाऊस पडल्यानंतर होलोट्रॅकिया प्रजातीचे भुंगेरे जमिनीतून एकाच वेळी बाहेर पडतात आणि बाभुळ व कडूनिंबाच्या झाडावर जमा होतात. फांद्या हलवून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ल्युकोफोलिस प्रजातीचे भुंगेरे उसाच्या पानांवरून गोळा करून मारावेत. प्रकाश/कॉम्बो सापळ्यांचा वापर करून भुंगेरे गोळा करून मारावेत. भुंगेरे गोळा करून नष्ट करणे हे नियंत्रण उपायांमध्ये सर्वात प्रभावी व कमी खर्चाचे आहे. तसेच यामुळे पुढील संक्रमण थांबविले जाते. सतत ३-४ वर्षे भुंगेरे गोळा करून मारावेत. सामुदायिकरित्या भुंगेरे गोळा केल्यास हुमणी कीडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास चांगली मदत होते.
- अति प्रादुर्भावग्रस्त शेतात उसाचा खोडवा घेऊ नये.
- पीक निघाल्यानंतर हुमणीग्रस्त शेताची मशागत रोटाव्हेटरने करावी.

२) जैविक नियंत्रण
-
जैविक कीड नियंत्रक ज्यामध्ये बिव्हेरिया बॅसियना, मॅटेरायझियम अॅनीसोपली त्याचा कंपोस्ट खतात मिसळुन, एकरी १० किलो या प्रमाणात वापर करावा. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट निर्मित जैविक कीटकनाशक बीव्हीएम (बव्हेरिया, व्हर्टिसिलीयम आणि मॅटेरायझियम) एकरी २ लिटर ४०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणीद्वारे द्यावे किंवा किंवा ठिबक सिंचनातून द्यावे.
- जीवाणू (बॅसिलस पॅपीली) व सूत्रकृमी (हेटरोरॅबडेटीस) हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्याचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
- कडूनिंब अथवा बाभळीच्या झाडावर क्लोरपायरीफॉस २०% प्रवाही २ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे. किटकनाशके फवारलेली पाने खाल्ल्याने भुंगेऱ्याचा बंदोबस्त होण्यास मदत होते.
- शेणखत, कंपोस्ट, इ. मार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात. त्यासाठी एक गाडी खतात एक किलो ३ जी कार्बोफ्युरॉन दाणेदार मिसळावे व नंतर खत शेतात टाकावे. उन्हाळ्यात शेण खताचे लहान ढीग करावेत.

३) रासायनिक नियंत्रण
- मोठ्या ऊसात (जून-ऑगस्ट) क्लोरपायरीफॉस २०% प्रवाही ५ लि./प्रति हेक्टरी १००० लिटर पाण्यात मिसळून जमिनीत आळवणी करावी.
- ऊस लागवडीच्या वेळी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ०.३ % दाणेदार फिप्रोनिल अथवा १०% दाणेदार फोरेट हे कीटकनाशक २५ कि./हे. मातीत मिसळावे व नंतर हलके पाणी द्यावे..

दिवसेंदिवस ऊस व इतर पिकात वाढत असलेला होलोट्रॅकिया हुमणीचा उपद्रव व करावी लागणारी उपाय योजना विचारात घेतली असता हुमणीग्रस्त गावातील सर्व शेतकऱ्यांनी हुमणी नियंत्रणासाठी सामुदायिक मोहीम हाती घेणे आवश्यक व गरजेचे आहे. त्यामुळे ४-५ वर्षात हुमणीचे नियंत्रण करता येणे शक्य होईल. जैविक कीड नियंत्रक (बी.व्ही.एम.) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे रू.२१०/- प्रति लिटर या दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे.

यादव आर. जी.
डॉ. शितोळे टी.डी.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे

Web Title: Life cycle and control of white grub in sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.