पर्यावरणामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे 'झाड'. झाडे असतील तर पाऊस पडेल, झाडे असतील तर प्राण्यांना ऑक्सिजन मिळेल आणि झाडे असतील तरच जैवविविधता टिकून राहील. पण दिवसेंदिवस झाडं आणि जंगलं कमी होत चालले आहेत. जंगले संपली तर भविष्यात त्याचे दुष्परिणाम काय होतील आणि झाडे लावण्याचं महत्त्व सांगणारा मराठी मातीतला मराठी चित्रपट येत्या २१ जून रोजी प्रदर्शित होत आहे.
मराठवाड्यातील बीडसारख्या दुष्काळी भागातील शेतकरीपुत्र सचिन डोईफोडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून 'झाड' असं या चित्रपटाचे शिर्षक आहे. एक झाड लावण्याचे महत्त्व किती आहे हे या चित्रपटातून सांगण्यात आलं आहे. द ग्रीन इंडिया फिल्म्स, बीडचे सचिन डोईफोडे आणि धुळ्याचे भूमीपुत्र योगेश राजपूत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'ग्रीन इंडिया, ग्रीन विश्व' असं 'द ग्रीन इंडिया फिल्म्स' या प्रोडक्शन हाऊसचे घोषवाक्य असून हरित भारत करण्याचे त्यांचे ध्येय आहे.
गावाशेजारी असलेले जंगल काही गावपुढाऱ्यांना गिळंकृत करून त्या जागेवर स्टील फॅक्टरी उभी करायची असते पण गावातीलच एक तरूण संघर्ष करून त्यांच्या या स्वप्नावर पाणी फिरवतो आणि गावातील जंगल वाचवतो असे या चित्रपटाचे कथानक असून हा चित्रपट पूर्णपणे बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागात चित्रित झाला आहे. पर्यावरणातील एक एक झाड कमी होत गेल्यामुळे कसा निसर्गाचा ऱ्हास होतोय आणि शेती व्यवस्थेवर याचा कसा परिणाम होतोय यावर हा चित्रपट भाष्य करतो.
चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन डोईफोडे, संपादन ऋषीराज जोशी, गायक आदर्श शिंदे आणि मुख्य कलाकार म्हणून दिलीप डोईफोडे यांनी काम पाहिले आहे. तर इतर सहकलाकार आणि बालकलाकार म्हणून या चित्रपटात जवळपास ४ हजार कलाकारांनी काम केले आहे.