राजेश बारसागडे
चंद्रपुर जिल्हातील नागभीड तालुक्यातील अनेक खेडेगाव जंगलात व जंगल मार्गाला लागून आहेत. येथे शेतीचे खरीप पीक हाच मुख्य व्यवसाय असल्याने उन्हाळ्यात लोकांना जीवन जगण्यासाठी कुठलाही रोजगार उपलब्ध नाही. म्हणून हिंस्र प्राण्यांची भीती असताना वितभर पोट भरण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जीव धोक्यात टाकून येथील गरीब व आर्थिकदृष्टया दुर्बल लोक जंगलात जाऊन मोहफुले वैचतात व कसेबसे जीवन जगतात. मोहफुलाला बाजारात मोठी मागणी असल्याने उन्हाळ्यात ही मोहफुलेच त्यांच्या जगण्याचा आधार झाली असल्याचे चित्र आहे.
सावरगाव परिसरातील वाढोणा, उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, आकापूर, खरकाडा, आलेवाही, जीवनापूर, बाळापूर, पारडी, येनोली, बोंड, राजुली आदी अनेक गावांतील नागरिक शेती व शेतीशी संबंधित कामे करतात. मात्र, उन्हाळ्यात रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध राहत नाही. याच कालावधीत साधारणतः मार्च, एप्रिल महिन्यात मोहाच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फुले येतात.
ही फुले आपसूकच गळून पडतात. ती फुले वेचून गोळा करण्याचे काम जंगल भागातील लोक करीत असतात. ती वाळवून मग ती व्यापाऱ्याला विकतात व आपला उदरनिर्वाह करतात. जंगल भागातील लोकांना मोहफुलांची ही निसर्गदत्त देणगीच मिळाली आहे. सध्या मोह फुलांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
मोहफुलांचे विविध उपयोग
मोहफुलांचा उपयोग खाद्य उत्पादने तयार करण्यासाठी केला जातो. यामध्ये प्रामुख्याने औषध, दारू आदी तसेच गुरांच्या खाद्यासाठी सुद्धा या फुलांचा उपयोग होतो. ग्रामीण भागातील लोक पावसाळ्यात वाळलेल्या फुलांपासून विविध खाद्यपदार्थ देखील बनवतात. हे शरीरासाठी पौष्टिक असल्यामुळे या भागातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी या फुलांचा मोठा उपयोग होत आहे.
हेही वाचा - मोहाफुलाचे लाडू, जॅम अन् चटणीची खवय्यांना पडली भुरळ
एका झाडापासून मिळतात ५० किलो फुले
एका झाडापासून जवळपास सुमारे ५० किलो फुले मिळतात व सुकलेल्या फुलांना ८० ते १०० रुपये किलो असा भाव जरी असला तरी व्यापारी लोक चढ्या भावाने ते मार्केटला विकत असल्याची माहिती आहे. कारण मोहफुलांना ठरलेली अशी कोणती बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे दलालांमार्फतच ही मोहफुले स्थानिक लोकांना कमी किमतीत विकावी लागतात.
राज्य सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी मोहफुलांवर आधारित उद्योग स्थापन करावा, अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रोजगाराचे साधन उपलब्ध होईल.
शेतीची कामे संपल्याने उन्हाळ्यात हाताला काम मिळत नाही. त्यामुळे मोहफुले गोळा करून महिना, दीड महिना रोजगार मिळतो. त्यामुळे कुटुंबाला मोठा आधार होतो. मात्र हिंस्र प्राण्यांमुळे जंगलात जाणे खूप जोखमीचे काम आहे. परंतु जगण्यासाठी ही रिस्क घ्यावीच लागते. - दुर्गेशनंदनी प्रणय बांगरे, रा. बोंड (राजुली), ता. नागभीड.