सुधीर लंकेअहमदनगर : नामांकित समजल्या जाणाऱ्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या कामकाजात काही अनियमितता व गंभीर स्वरूपाचे दोष निदर्शनास आल्याने नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांनी बँकेशी संबंधित १९ मुद्द्यांचे लेखापरीक्षण करून तपासणी करण्याचा आदेश दिला आहे.
विशेष लेखापरीक्षकांमार्फत ही तपासणी सुरू आहे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी गत आठवड्यात मुंबई येथील कार्यक्रमात बोलताना नगर जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत चिंता व्यक्त केली होती.
सहकार विभागाकडे या बँकेच्या कामकाजाबाबत काही अहवाल व तक्रारी गेल्याने नाशिकच्या सहनिबंधकांनीही बँकेची तपासणी सुरू केली आहे. सध्या या बँकेवर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले हे अध्यक्ष आहेत. संचालक मंडळात सर्वपक्षीय प्रस्थापित नेत्यांचा समावेश आहे.
बँकेने कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखाना व पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखाना यांची बाहेरील कर्ज घेण्याची मर्यादा संपलेली असताना त्यांना तब्बल अनुक्रमे ३२५ कोटी व ३७८ कोटींचे कर्ज दिले. अगस्ती सहकारी साखर कारखान्यास अशाच पद्धतीने ३७८ कोटींचे कर्ज दिले.
लोकनेते मारुतराव घुले-पाटील, मुळा सहकारी साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व कर्मवीर भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासही कर्ज उभारणी मर्यादा संपुष्टात आली असताना व कर्जाची उच्चतम मर्यादा संपली असताना कर्ज दिले.
अशोक सहकारी साखर कारखान्यास स्टॅम्प ड्युटी वसुली न करता कर्ज दिले. सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यास नोंदणीकृत गहाणखत न करताच कर्जाचे वितरण केले. सीडी रेशिओ टिकविण्यात बँक अपयशी ठरलेली आहे.
तसेच बँकेने सीडीएस या संगणक प्रणालीबाबत खुल्या निविदा न राबविता जुन्याच पुरवठादाराकडून ६५ कोटींचा प्रस्ताव घेतला आहे. बँकेची शेती कर्जाची थकबाकी वाढली आहे. अशाप्रकारच्या १९ मुद्द्यांवरून ही तपासणी सुरू आहे.
या तपासणीसाठी प्रभारी विशेष लेखापरीक्षक डी. आर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बँकेकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात बँकेचे अध्यक्ष कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे यांना 'लोकमत'ने संपर्क केला. मात्र, त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही.
बाद झालेल्या ११ कोटी ६८ लाखांच्या नोटा बँकेत• चलनातील बाद झालेल्या ११ कोटी ६८ लाख रुपयांच्या नोटा बँकेत पडून आहेत.• बँकेने याबाबत काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे ही रक्कम कुंठीत झाली. यात बँकेचे आर्थिक नुकसान झाले आहे.• याची तपासणी होऊन जबाबदारी निश्चितीची कार्यवाही व्हावी, असेही विभागीय सहनिबंधकांनी आदेशात म्हटले आहे.
जिल्हा बँकेची याबाबत पडताळणी• सीडी रेशो टिकविण्यात बँक अयशस्वी ठरली आहे. मार्च २०२४ अखेर हे प्रमाण ७५.६२ टक्के इतके होते. मे २०२४ अखेर हे प्रमाण ८७.३१ टक्के झाले.• बँकेच्या मुख्य इमारतीतील पहिला व तिसरा मजला नूतनीकरणाबाबत करावयाच्या भांडवली खर्चाबाबत तपासणी करणे.• बँकेचे मागील आर्थिक वर्षात ३५७ लाख इतक्या रकमेचे आर्थिक नुकसान झाले आहे. या बाबीची तपासणी होऊन संबंधितांवर जबाबदारी निश्चित व्हावी.• बँकेची खासगी गुंतवणूक १० ते १५ टक्के अपेक्षित असताना ती ३४.६३ टक्क्यांवर गेली आहे.• बँकेच्या प्रलंबित देणे प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई व्हावी.• जिल्हा बँकेची राज्य बँकेतील गुंतवणूक १ हजार ७७ कोटीने कमी झाली आहे. त्याचा बँकेच्या लिक्वीडिटीवर परिणाम झाला आहे. ही बाब गंभीर असून, बँकेने ओव्हरट्रेडिंग केले आहे.
बँकेची चौकशी सुरू असल्याची चर्चा कानावर आली; पण याबाबत तपशील माहीत नाही. ही बाब अध्यक्ष सांगू शकतील. - माधवराव कानवडे
नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या आदेशावरून नगर जिल्हा सहकारी बँकेची १९ मुद्द्यांबाबत आर्थिक पडताळणी सुरू आहे. सदरचा अहवाल सहनिबंधकांना सादर केला जाईल. - डी. आर. पाटील, प्रभारी विशेष लेखापरीक्षक, नाशिक