सोलापूर : जसा पावसाळा संपला, तशी खरीप पीक कर्जवाटपाची मुदतही संपली. मात्र, बँकांनी हात आखडता घेतल्याने सर्व बँकांचे कर्जवाटप ८३.७५ टक्क्यांवर थांबले. आता रब्बी हंगामासाठीही शेतकरी बँकांच्या पायऱ्या झिजवणार आहेत. मात्र, बँकांनी सकारात्मकता दाखविली तरच शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे.
खरीप हंगामासाठी राष्ट्रीय, खासगी व सहकारी बँकांना दोन लाख शेतकऱ्यांना २,४९८ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात २,०९० कोटी रुपये इतके पीक कर्ज बँकांनी वाटप केले आहे. खरीप कर्जवाटपाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. उद्दिष्टाच्या ८३.७५ टक्के इतकेच कर्जवाटप झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरीप पेरणीवर भर देत असल्याने बँकांना कर्जवाटपाचे उद्दिष्टही वाढवून दिले जात आहे. मात्र, दर दोन-तीन वर्षांनंतर शेतकऱ्यांकडील पीक कर्ज थकबाकी वाढत आहे. यामुळे बँकांचीही अडचण होत आहे. डीसीसी बँकेने दिलेल्या उद्दिष्टातील १४३ कोटी कर्ज कमी दिले असल्याचे लिड बँकेकडील तक्त्यावरून दिसत आहे.
रब्बीचे क्षेत्र पाच लाख हेक्टर.- सोलापूर जिल्ह्याचे रब्बी पेरणी सरासरी क्षेत्र ४ लाख ८५ हजार हेक्टर इतके आहे. मात्र, पेरणीसाठी जमिनीत उपयुक्त ओल नसल्याने रब्बी पेरणीला म्हणावा तितका वेग आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४६ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पेरणी झाली आहे. पाऊस नसल्याने ज्वारी पेरणी क्षेत्रात मोठी घट होईल, असा अंदाज आहे. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्यावर गहू व हरभऱ्याची पेरणी होईल, असे सांगण्यात आले.- मागील वर्षीपेक्षा यंदा रब्बी पेरणीचे उद्दिष्ट ३१ हजार हेक्टरने वाढविले आहे. रब्बी हंगामासाठी सरकारी, खासगी व सहकारी बँकांना १,८७१ कोटी ४५ कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आता बँकांचा कर्जवाटपाचा वेग किती राहणार, यावर उद्दिष्ट अवलंबून आहे.
क्षेत्र साडेचार एकर आहे. हंगामी बागायती जमीन आहे. शेतीसाठी कर्ज मागणी करतो; मात्र, बँका कर्ज देत नाहीत. कधी क्षेत्राचे तर कधी हंगामी बागायती असल्याचे कारण सांगतात, बँकांत वारंवार पाठपुरावा केला; मात्र, कर्ज काही मिळत नाही. - अनिल साठे, शेतकरी, वडाळा
जिल्हा मध्यवर्ती बँक, सरकारी व खासगी बँकांचे बहुतांशी शेतकरी नेहमीचे खातेदार आहेत. ते दरवर्षीच जुने कर्ज भरतात व नव्याने कर्ज काढतात. ज्या शेतकऱ्यांना कर्जाची गरज आहे, त्यांनी आपल्या नेहमीच्या बँकेत अर्ज करावेत. - प्रशांत नाशिककर, प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक