दीपक शिंदेसातारा : राज्यातील सहकार क्षेत्रातील अडचणीत असलेल्या आणि आर्थिक मदत आवश्यक असलेल्या १३ साखर कारखान्यांना 'एनसीडीसी'कडून (राष्ट्रीय सहकारी विकास निगम) १,८९८ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
आठ वर्षांसाठी हे कर्ज देण्यात आले असून, त्याची वेळेत परतफेड करायची आहे. ती न केल्यास दोन टक्के अतिरिक्त दंडही आकारण्यात येणार आहे. या कर्जरूपी मदतीमुळे अडचणीतील साखर कारखान्यांना आपले पुढील गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने करता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील १३ कारखान्यांसाठी राज्य सरकारने एनसीडीसीकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारच्या आवाहनानुसार आणि जबाबदारीवर एनसीडीसीने या तेरा कारखान्यांसाठी १,८९८ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.
आठ वर्षांसाठी देण्यात आलेल्या या कर्जामध्ये दोन वर्षांचा कालावधी हा स्थगितीचा कालावधी आहे. हे कर्ज पहिल्यांदा साखर कारखान्यांनी ज्या बँकांकडून कर्ज घेतले आहे, त्याच्या मुदत कर्जासाठी त्यानंतर भांडवली खर्चासाठी व उर्वरित रक्कम ही नियोजित हंगामासाठी वापरण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकार आणि सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र शासन आणि प्रादेशिक संचालनालय पुणे यांना ज्या कारखान्यांना कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. त्याचा योग्य वापर होतो की नाही, याबाबत लक्ष ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच, या कर्जाचा वापर पगार किंवा संचालकांना मानधनासाठी करू नये, अशा सूचनाही केल्या आहेत.
या कारखान्यांना मिळाले इतके कर्ज■ लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि., सुंदरनगर, बीड - १०४ कोटी■ श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि., मंगळवेढा, सोलापूर - १०० कोटी■ श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि., आदिनाथनगर, अहमदनगर - ९९ कोटी■ लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना लि., नेवासा, अहमदनगर - १५० कोटी■ किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना लि., भुईज, सातारा - ३५० कोटी■ किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योग लि., खंडाळा, सातारा - १५० कोटी■ अगस्ती सहकारी साखर कारखाना, अगस्तीनगर, अहमदनगर - १०० कोटी■ सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, अहमदनगर - १२५ कोटी■ श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर, कोल्हापूर - ३५० कोटी■ श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना लि. धाराशिव - १०० कोटी■ राजगड सहकारी साखर कारखाना लि., अनंतनगर निगडे, पुणे - ८० कोटी■ अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि., अंबासाखर, बीड - ८० कोटी■ सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर फॅक्टरी लि., श्रीगोंदा, अहमदनगर - ११० कोटी
'एनसीडीसी'कडून योग्य वेळी कर्ज मंजूर झाले आहे. त्यामुळे किसनवीर आणि खंडाळा साखर कारखान्यांसाठी फायदाच होणार असून, कारखान्यांसाठी ही नवसंजीवनीच मिळाल्यासारखे आहे. - प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष, किसनवीर सहकारी साखर कारखाना, भुईंज, सातारा