नागपूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीबाबत घेतलेला निर्णय सत्ताधाऱ्यांच्या अंगलट आल्याचे या लाेकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. राज्यातील कांदा उत्पादक पट्ट्यातील ११ पैकी आठ जागा विराेधी पक्षांनी बळकावल्या असून, विराेधक त्यांच्या दाेन आणि सत्ताधारी एक जागा कायम ठेवण्यात यशस्वी झाले. त्यामुळे या लाेकसभा निवडणुकीत कांदा ‘जाॅयंट किलर’ भाजपसाठी ठरला आहे.
महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, शिर्डी, अहमदनगर, शिरूर, धाराशिव (उस्मानाबाद), सोलापूर, बारामती, मावळ आणि बीड या लाेकसभा मतदारसंघांत कांद्याचे माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ राेजी कांद्यावर निर्यातबंदी लादली आणि मार्च २०२४ मध्ये या निर्यातबंदी मुदतवाढ दिली. नंतर ४ मे २०२४ राेजी ही निर्यातबंदी उठविण्यात आली. मात्र, या चार महिन्यांत राज्यातील कांदा उत्पादकांचे किमान २६५ काेटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
याच काळात एनसीईएल या सरकारी कंपनीने केलेल्या कांदा निर्यातीतील घाेळ, नाफेडने खरेदी केलेल्या पाच लाख टन कांदा खरेदीतील भ्रष्टाचार व शेतकऱ्यांची लूट, कांद्याच्या निर्यात मूल्यात केलेली अवाजवी वाढ, कांदा उत्पादनात कागदाेपत्री मुद्दाम दाखविण्यात आलेली घट या तत्सम बाबींमुळे राज्यातील कांदा उत्पादकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विराेधात प्रचंड राेष निर्माण झाला आणि राेष निवडणूक निकालाच्या रूपाने दिसून आला.
सत्ताधाऱ्यांनी या दिग्गजांच्या जागा गमावल्याकांदा उत्पादकांच्या राेषामुळे केंद्रीय मंत्री तथा दिंडाेरीच्या भाजपच्या उमेदवार डाॅ. भारती पवार, धुळ्याचे भाजपचे उमेदवार डाॅ. सुभाष भामरे, अहमदनगरचे भाजपचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील, साेलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते, बीडच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे, नाशिकचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गाेडसे, शिर्डीचे शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लाेखंडे, धाराशिव (उस्मानाबाद)च्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील या सत्ताधारी आठ उमेदवारांना पराभवाला सामाेरे जावे लागले.
तिघांना पुन्हा संधीराष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना बारामती तर याच गटाचे अमाेल काेल्हे यांना शिरूर तसेच शिवसेना शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही खासदारांनी सन २०१९ च्या निवडणुकीत याच मतदारसंघातून विजय संपादन केला हाेता.
२२ आमदार असूनही भाजप शून्यया ११ लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (दाेन्ही गट) २५, भाजपचे २२, काँग्रेस व शिवसेना (दाेन्ही गट) प्रत्येकी ७, एमआयएम व अपक्ष प्रत्येकी दाेन आणि इतर एक असे एकूण ६६ आमदार आहेत. भाजपचे २२ आमदार असूनही त्यांचा एकाही उमेदवार निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरला नाही.
माेदी, गडकरींच्या सभा निष्प्रभपंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी बारामती, धाराशिव, बीड, अहमदनगर, दिंडाेरी येथे प्रचारसभा घेतल्या हाेत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कांदा पट्ट्यातील शेतकऱ्यांना कांद्यावरील निर्बंध हटविणार असल्याची ग्वाही दिली हाेती. मात्र, शेतकऱ्यांनी या नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवला नाही.