Join us

आंबा फळपिकासाठी दीर्घकालीन योजना राबवाव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:53 PM

हवामानावर आधारित आंबा पीक आहे. सद्य:स्थितीत आंबा हंगामाची कोणतीच गणिते बांधली जाऊ शकत नाहीत. अशीच स्थिती कमी अधिक फरकाने अन्य पीक उत्पादक शेतकऱ्यांची आहे. बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर होणार परिणाम होत असल्याचे आनंद देसाई यांनी मुलाखतीतून स्पष्ट केले.

अन्य व्यवसायाची तुलना शेती व्यवसायाशी होऊ शकत नाही. हवामानावर आधारित आंबा पीक आहे. सद्य:स्थितीत आंबा हंगामाची कोणतीच गणिते बांधली जाऊ शकत नाहीत. नवनवीन कीटकनाशके बाजारात येतात; मात्र ती परिणामकारण ठरत नाहीत. अशीच स्थिती कमी अधिक फरकाने अन्य पीक उत्पादक शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी दीर्घ कालावधीकरिता योजना राबविणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा आंबा बागायतदार आनंद देसाई यांनी व्यक्त केली. बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर होणार परिणाम होत असल्याचे आनंद देसाई यांनी मुलाखतीतून स्पष्ट केले.

प्रश्न : यावर्षी आंबा उत्पादन कसे राहील? देसाई : यावर्षी कमी पावसामुळे नोव्हेंबरमध्ये आंब्याला मोहर आला. मात्र, त्यानंतर दोनवेळा अवकाळी पाऊस झाल्यामुळे पहिल्या टप्यातील मोहर खराब झाला. दुसऱ्या टप्यात मोहर आला. परंतु, नर मोहर अधिक असल्याने फळधारणा झालीच नाही. तिसऱ्या टप्प्यातील मोहर सुरू झाला आहे. जोपर्यंत फळधारणा होत नाही तोपर्यंत आंबा उत्पादनाचे एकूण चित्र स्पष्ट होत नाही. २००७ पर्यंत आंबा बागेत फिरून उत्पन्नाची गणिते बांधता येत होती. मात्र हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे आंबा उत्पादनाची गणिते बांधणे अशक्य झाले आहे.

प्रश्न : कीटकनाशकांचा प्रभाव कितपत आहे?देसाई : रात्री गारठा, दिवसा उकाडा, कधी मळभ असे विषम  हवामान कीड रोगासाठी पोषक ठरते. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पालवी आली, पालवीवर तुडतुड्याचे प्रमाण अधिक होते, आताही आहे. मळभ व पहाटे पडणाऱ्या दवामुळे भुरी (बुरशी) चा धोका आहे. बुरशीवर नियंत्रण मिळवता येते. एका ऋतूत संमिश्र ऋतूंचा अनुभव येतो. आंब्याला निच्चत्तम तसेच अधिकत्तम तापमान चालत नाही. दरवर्षी बाजारात नवनवीन कीटकनाशके येतात; मात्र कीडरोग नियंत्रणासाठी अप्रभावी ठरत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

प्रश्न : कीटकनाशकांच्या किमतीत वाढ होत आहे का?देसाई : शासनाने जुन्या कीटकनाशकांवर बंदी आणली आहे. नवनवीन कीटकनाशके दरवर्षी बाजारात येतात. मात्र, फवारणी करूनही अपेक्षित प्रभाव दिसत नाहीत. तुडतुड्यावरील कीटकनाशकांच्या किमती दोन हजारांपासून १५ हजार रुपये लिटर; तर थ्रीप्सवरील कीटकनाशके तीन हजारांपासून वीस हजार रुपयांपर्यंत आहेत. अपेक्षित बदल होत नसल्याने शेतकऱ्यांना दर दहा ते १५ दिवसांनी फवारणी करावी लागते. आशावादी असल्याने शेतकरी पीक वाचविण्यासाठी हे करत आहे.

प्रश्न : शासनाकडून काही अपेक्षा आहेत का?देसाई : आंबा बागायतदारांना सहा महिन्यांसाठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. जूनमध्ये पैसे मिळतील अशी अपेक्षा असते. मात्र, हे चित्र आता धूसर बनू लागले आहे. कीटकनाशके, खतांच्या किमतीवर नियंत्रण आणून शेतकऱ्यांना अनुदानावर आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. 'फयान'नंतर येथील आंबा उत्पादकता दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. हवामान व हवामानातील होणारे बदल याबाबत कृषी विद्यापीठातून संशोधन होऊन कीडरोग नियंत्रणासाठी प्रभावी ठरणारी कीटकनाशके बाजारात आणली पाहिजेत. नुकसान झाले की तुटपुंजी मदत देण्याऐवजी शेतकऱ्यांना भक्कम पाठिंबा शासनाने देणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी उपाययोजना राबवावेत.

थ्रीप्सचे संकटजानेवारीत थंडीचा कडाका वाढला की, थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढतो. थ्रीप्ससाठी महागडी कीटकनाशके बाजारात असूनसुद्धा त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. जिल्ह्यात कृषी विद्यापीठ असून, त्याद्वारे संशोधन होणे गरजेचे आहे. कीटकनाशकांच्या वाढत्या किमतीवर शासनाने नियंत्रण आणावे.

- मेहरून नाकाडे, रत्नागिरी

टॅग्स :आंबाफळेशेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रणखतेहवामान