फळांचा राजा आंबाबाजारात दाखल झाला आहे. आणखी दोन आठवड्यानंतर स्थानिक केशरसह गावरान आंबाबाजारात उपलब्ध होईल. सध्या हापूस आंब्याची आवक सर्वाधिक झाली असून विक्री होत आहे. यामध्ये ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. कोकणातील हापूस आंब्याबरोबर कर्नाटकचा आंबाही विक्री केला जात आहे. हा दिसायला हापूससारखा आहे. मात्र, चव चाखल्यानंतर तो ओळखता येतो, असे काही ग्राहकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
आंब्याचा रस सर्वांनाच आवडतो. मात्र, स्थानिक आंब्याचा रस खाण्याची मजा वेगळीच आहे. यासाठी आणखी १० ते १५ दिवस थांबावे लागणार आहे. सध्या बाजारात परराज्यातील आंबा दाखल झाला असून हापूस ३५० ते ४०० रुपये किलो तर केशर १५० रुपये किलोने विक्री होत आहे.
यामध्ये सर्वाधिक कोकणातील हापूस आंब्याचा समावेश असल्याचे बोलले जाते. मात्र, बहुतांश विक्रेत्यांकडून कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकातील आंब्याची विक्री होताना दिसत आहे. हापूस आंबा समजून अनेक वेळा खरेदी केला जातो. मात्र, प्रत्यक्षात तो खाल्ल्यानंतर त्याची चव काहीशी वेगळी लागते.
याबाबत काही ग्राहकांकडून तक्रारी वाढल्या आहेत. काही ग्राहकांनी खरेदी केलेला हापूस आंबा विक्रेत्याला परत आणून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळी काही विक्रेत्यांनी वातावरणातील सततच्या बदलामुळे यंदा आंब्याची चव बदलली असल्याचे 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
मेच्या दुसऱ्या आठवड्यानंतर स्वस्त?
■ दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. आगामी १० ते १५ दिवसांत स्थानिक केशरसह इतर गावरान आंबा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर परराज्यातून दाखल झालेल्या आंब्याचे दर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आंब्याची गोडीही वाढणार आहे..
उपलब्ध होणाऱ्या आंब्याची करावी लागतेय विक्री...
9 सध्या बाजारात परराज्यातील आंब्याची आवक वाढली आहे. यामध्ये हापूस आंब्याचा सर्वाधिक समावेश आहे. मार्केटमध्ये हापूस आंबा म्हणून माल येतो. यामध्ये अस्सल हापूस कोणता आहे, याबाबत जास्त माहिती नाही. जो आंबा मार्केटमध्ये उपलब्ध होतो, त्याची खरेदी करून विक्री केली जाते. अनेक ग्राहक चव चांगली लागली नाही तर तक्रारी करतात, असे धाराशिव शहरातील विक्रेते पेठे यांनी 'लोकमत'ला सांगितले.
स्थानिक आंबाच खाल्लेला बरा
● आंब्याचा सिझन सुरु झाला की, पहिल्यांदा हापूस आंब्याची चव चाखावी वाटते. त्यानंतर स्थानिक केशर व गावरान आंबा खाल्ला जातो. यंदा हापूस आंबा घेतला. मात्र, त्याची चव गतवर्षाच्या हापूस आंब्यासारखी लागली नाही. यामुळे मोठा भाव आकारलेल्या आंब्याला चव नसेल तर स्थानिक आंबा बाजारात आल्यावर खाल्लेला बरा, असे ग्राहक शीतल शेरकर म्हणाल्या.