निसर्गाचा लहरीपणामुळे अवकाळी पाऊससह अन्य वातावरणीय बदलामुळे शेतीचा खर्च आणि उत्पादनाचे गणित दिवसेंदिवस अधिक बिघडत चालले आहे. त्यात शेतातला जर विद्युत पंप बिघडला, तर त्याच्या दुरुस्तीचा खर्च हा सुमारे दहा हजारांच्या घरात जातो.
त्यामुळे हा आर्थिक फटका परवडणारा नसून, शेतकऱ्यांनी ऑटो स्वीच न बसवता कॅपॅसिटर बसवून ३० टक्के वीज वाचवणे व सोबत पंप खराब होण्याचा आर्थिक फटका देखील यामुळे वाचविता येतो.
राज्यात एकूण वीज वापरात शेती क्षेत्राचे प्रमाण ३० ते ३१ टक्के इतके सर्वाधिक आहे. शेतीला वीजपुरवठा करण्यासाठी वीज वितरण रोहित्रे महत्त्वाची घटक आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडून शेतातील शेती पंपांना ऑटो स्वीच बसविले जाते.
त्यामुळे या मानवी चुकीमुळे शेतकरी, तसेच महावितरणचे मोठे नुकसान यामुळे होत आहे. त्यासाठी कॅपॅसिटर बसवणे आवश्यक असल्याचे महावितरणकडून जनजागृती केली जात आहे.
रोहित्र जळण्याच्या घटना वाढल्या
राज्यात सुरक्षित विजेच्या वापराअभावी शेतकऱ्यांच्या मोटारी जळण्याचे, नादुरुस्त होण्याचे प्रमाण १० ते १२ टक्के आहे. त्यात आता रब्बीचे पिकांचे घेण्याचे कामे सुरू असून, रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्याचे कामे सुरु आहे. त्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाणही सुमारे १० ते १२ टक्के वाढले आहे.
'ऑटो स्विच'चे धोके काय?
बऱ्याच ठिकाणी कृषीपंपांना अॅटोस्विच लावले जातात. त्यामुळे विद्युतपुरवठा सुरु झाल्यानंतर एकाच वेळी परिसरातील सर्वच्या सर्व विद्युत मोटारी सुरू होतात. परिणामी एकाचवेळी अचानकपणे त्याचा भार सर्व मोटारींसह रोहित्रावर येतो आणि ते नादुरुस्त होतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोटारी जळतात आणि दहा ते वीस हजारांचा आर्थिक फटका बसतो.
कॅपॅसिटर बसवा, ३० टक्के वीज वाचवा
कृषी विद्युत पंपाचा पॉवर फॅक्टर ०.९ इतका कमीत कमी पाहिजे. तसा विद्युत वितरणाचा नियम आहे. त्यासाठी ग्राहकाने मोटारीला कॅपॅसिटर बसविणे बंधनकारक आहे. साधारणपणे मोटारीचा पॉवर फॅक्टर ०.५ ते ०.६ इतका असतो. कॅपॅसिटर बसविल्यामुळे ३० टक्के विजेची बचत यामुळे होते, असे महावितरणकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी विद्युत पंपाला कॅपॅसिटर बसविल्यास ३० टक्के विजेची बचत करू शकतात, तसेच पंपाला ऑटोस्विच न लावून स्वतःचे व महावितरणचे नुकसान शेतकरी टाळू शकतात. - इब्राहिम मुलाणी, मुख्य अभियंता, महावितरणच्या जळगाव परिमंडळ.