Lokmat Agro >शेतशिवार > रानातले चांदणे हरवले

रानातले चांदणे हरवले

Lost the moonlight in the forest na dho mahanor death | रानातले चांदणे हरवले

रानातले चांदणे हरवले

एखादा दिवस खूप खूप उदास उगवतो. एखादे नक्षत्र मालवून जावे आणि सगळीकडे मनाला थिजवून टाकणारी ग्लानी पसरावी असे होते. ...

एखादा दिवस खूप खूप उदास उगवतो. एखादे नक्षत्र मालवून जावे आणि सगळीकडे मनाला थिजवून टाकणारी ग्लानी पसरावी असे होते. ...

शेअर :

Join us
Join usNext

एखादा दिवस खूप खूप उदास उगवतो. एखादे नक्षत्र मालवून जावे आणि सगळीकडे मनाला थिजवून टाकणारी ग्लानी पसरावी असे होते. खूप खूप आठवत रहाते. त्या आठवणींनीचा झोका थांबता थांबत नाही. आतल्या आत गलबलून येते. पाखरांनी आभाळात खेळ मांडावा तश्या आठवणी. आपल्या मनाला वेटाळून असणाऱ्या. 
"जन्मभराचे दुःख, जन्मभर असो" असेच काहीसे म्हणणारा एक महान रानकवी आज भर पावसाळी दिवसात दिगंतात उडून गेला. 
"तुका उडून जाताना, देहू निरभ्र उदास" आज या कवितेची देहू अशीच उदास झालीय.  

अगदी दीडेक महिन्यांपूर्वीच दादा नांदेडला आलेले. तीन दिवसाचा मुक्काम. रोज रात्री मी आणि दादा मध्यरात्रीपर्यंत गप्पा करत बसायचो. कितीतरी आठवणी दादा सांगत होते. अवघ्या जन्माचा धांडोळा घ्यावा तसे बोलत होते. नेहमी दिसायचा तोच उत्साह, तेच कवितेत आणि रानात हरवून जाणे, बोलता बोलता अबोल होणे. त्या अबोलण्यातही बरेच काही साठवलेले.  

महानोर या शब्दातच एक जादू होती. या कवीचे असणे हे अनेकांना धीर देणारे, बोलके करणारे असायचे. शेती-मातीला भिडून असणारी कृषिजन संस्कृती दादांच्या लेखनातून-बोलण्यातून सतत पाझरत असायची. 'पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे, वाऱ्यावर गंधभार भरलेले ओचे, घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे.' असे गंधभारीत मातीचे वैभव या माय मराठीला देणारा हा थोर कवी.  

दहावीत असताना पाठ्यपुस्तकातून पहिल्यांदा भेटलेला हा रानकवी माझ्यासारख्या शेतकरी तरुणांचा सखा झालेला. रानातल्या कविता मी जालन्याच्या कॉलेजात शिकायला असताना उशाशी घेऊन झोपायचो. गावाची, शेत शिवाराची आठवण आली की ओलेत्या डोळ्यांनी वाचत बसायचो. "गारठ्याची रात्र थंडाई हवेला, चांदण्याची शीळ ओल्या जोंधळ्याला, दूर लखाखत्या दिव्यांनी गाव जागे, मी इथे कवळून माझ्या गोधडीला" असे शब्द मनाला दिलासा द्यायचे. कितीतरी गोष्टी मनाला वेढून टाकणाऱ्या. आपल्या वाटणाऱ्या. ही कविता आणि कवी माझा पूर्वज आहे याचे भान देणाऱ्या. माझी त्या काळाची सारी धडपड या कवीच्या भोवती फिरत रहायची. कसा असेल हा कवी, सतत वाटत रहायचे. हसरा, उभट चेहरा, गळ्यात साधा काळा दोरा बांधलेला, सदरा आणि पायजमा असल्या कुणबी पेहरावातला. एखादा कवी त्याच्या कवितेसह आपला वाटणे ही जादू केवळ महानोर या नावातच होती. दूर कुठे महानोर येणार असतील तर एखाद्या जत्रेला जावे तसा मी जात असे. त्यांची कविता ऐकून मन भरून येत असे. या कवितेने दिलेली ग्लानी मग कित्येक दिवस पुरायची.  

या कवीने मला काय दिले? खूपदा विचार करतो मी. माझ्या कवितेला आपले असे स्वत्व असायला हवे, हे मला याच कवीने शिकवले. माझी 'बळीवंत' मधली कविता वाचून दादा म्हणायचे, तुझी कविता ही माझ्या कवितेचा सघन विस्तार आहे. ही खास तुझी कविता आहे. शेती मातीतली. शेतीचे दुःख कवितेतून येणार नसेल तर तो कवी कामाचा नाही. 
दादांचे हे शब्द कायम उभारी देणारे असायचे. येवढ्या मोठ्या कवीने माझ्यासारख्या बारीकश्या कवीला आपले म्हणणे, हे दादांचे थोरपण होते. मला अकादमी मिळाला तेव्हा दादा जवळपास तासभर बोलत होते. एका शेतकरी जाणिवेला भारतीय स्तरावरला बहुमान मिळणे याचा अतीव आनंद त्यांना झालेला. 

मी जळगावला बदलून गेलो. त्यापूर्वी कोकणात होतो. वडिलांचे आजारपण. दादांनी माझ्या मंत्र्याला माझ्यासाठी विनंती केली. लौकिक जीवनातही दादा सतत धावून येत. मनावरला भार हलका करत. मी जळगावला गेल्यानंतर भेटी वाढल्या. खूप गप्पा होऊ लागल्या. दादा आणि वहिनी खूपदा माझ्या सरकारी बंगल्यावर सकाळीच फिरत फिरत येत. सौ शालूशी दोघेही निवांतपणे गप्पा मारत बसत. मी झोपलेला असे. दादा म्हणत, त्याला उठवू नको. साहेब आहे तो. आणि मनमोकळे हसत. मग मी उठलो की पुन्हा गप्पा सुरु होत.  
पळसखेडला जाणे होत असे. दादा मनापासून स्वागत करत. सोबत शंभू पाटील असत. त्याचे आणि दादांचे खूप वेगळे नाते. जळगावला शंभुने दादांना सोबत घेऊन अनेक कार्यक्रम बसवले. विसाव्या शतकातली कविता, हा त्यातला एक. बहिणाबाई, बालकवी, ना घ, अनुराधा पाटील, होळकर ते माझ्यापर्यंत अनेक महत्वाचे कवी त्यात दादांनी घेतलेले. 
पळसखेडचे दादांचे शेत म्हणजे एक प्रयोगभूमी. मोसंबी, सीताफळ, पाणी अडवणे, शेत बंधारे असे कितीतरी प्रयोग दादांनी खुप तळमळीने केलेले. हे सगळे सगळ्या शेतकऱ्यांनी पहावे, करावे असे त्यांना कायम वाटत रहायचे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत गेले. दादा खूप बेचैन होत. याच अवस्थतेतुन त्यांनी 'हा काळोखाचा रस्ता आपला नाही' हे दीर्घ चिंतन लिहिले. त्याबद्दल ते माझ्याशी खूपदा बोलत. मी जळगाव असताना शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्ती, हा उपक्रम राबविला. शेकडो शेतकरी मुक्त केले. दादांना त्यावेळी झालेला आनंद मी आजही विसरू शकत नाही. कवितेच्या पुढे जाऊन कुणब्यांच्या जगण्यात उजेड यावा, याची मागणी करणारा, प्रार्थना करणारा हा कवी. 
"नांगरून पडलेली जमीन सर्वत्र, नुसताच शुकशुकाट, एखादेच चुकार वासरू कुठेतरी, उध्वस्त घाट' महानोरांच्या कवितेत असलेलं हे खेडे दुर्दैवाने फारसे कोणाला दिसले नाही. खेड्यातल्या जगण्याला थेट भिडणारी कितीतरी कविता त्यांनी लिहिली. केवळ रोमँटिक कविता लिहून ते थांबले नाही. "सरलं दळण, ओवी अडली जात्यात, उभ्या जन्माचा उमाळा, कळ सोसून डोळ्यात" असा उमाळा याच कवितेने लोकगीताचे संस्कार पचवून मराठीला दिला. 

मराठी कवितेला एक वेगळी, लोभस अशी प्रतिमासृष्टी त्यांनी दिली. महानोरांची सगळी कविता वाचताना शब्दांचे हे सारे लखलखीत वैभव समोर येते. "पीक करपलं, पक्षी दूरदेशी गेलं, गळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबलं" अशी खिन्न करणारी उदास जाणीव ही खास महानोरांची आहे. दुष्काळ पाठीपोटाला बांधून फिरणारी सारी जीवसृष्टी त्यांनी आपल्या कवेत घेतली. तुकोबांना आपला पूर्वज मानणारा हा महाकवी. शेतीत आणि शेतकऱ्यांच्या जीवनात असते ती संपूर्ण नैतिक जाणीव हा या कवीचा प्राण होता. थोरोचे जीवनतत्व तो आपल्या जगण्यावागण्यात कायम जपत होता. त्यांच्या गाडीवर 'रानकवी' असे लिहिलेले असायचे. त्याच्या तळाशी गेले की महानोरांचे सारे जीवन दिसते. कोणालाही कश्याची मागणी न करणारा हा कवी मराठी समाजाला समृद्धी देत गेला. जाताना कवितेचे साजिवंत वैभव आपल्यासाठी सोडून गेला. 

कवी आणि समाज यांचे नाते काय असावे, हे कळते ते महानोरांच्या जगण्याकडे आणि साहित्याकडे पाहून. '...जन्मापासूनचे दुःख जन्मभर असे, जन्मभर राहो मला त्याचे न फारसे। साऱ्यांसाठी झाले उभ्या देहाचे सरण, सगे सोयरेही कधी जातात दुरून। डोळे गच्च अंधारून, तेव्हा माझे रान, रानातली झाडे मला फुले अंथरून।' रानाशी असणारी अशी जैविक एकात्मता मराठी कवितेला बहाल करणारा हा रानकवी त्याच्या प्रिय अश्या गावखेड्यात, रानात आता कायम चिरविश्रांती घेणार आहे. रानातली पाखरे, झाडेझुडे, ओहळ नाले कायम त्याच्याशी बोलत रहातील. 
"गुंतले प्राण ह्या रानात  माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदूनी बेहोष होता
शब्दगंधे तू मला बाहुत घ्यावे."

- श्रीकांत देशमुख.

Web Title: Lost the moonlight in the forest na dho mahanor death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.