सध्या शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतीतील बहुतांश कामे यंत्राच्या साहाय्याने करण्यात येत आहेत. यंत्राची मागणी वाढल्याने मालकांनी भावही वाढविले आहेत. याचा फायदा यंत्रमालकांना होत असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसत आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला अर्ज भरण्यास व्यस्त आहेत. त्यामुळे निंदणीसह विविध कामांसाठी मजूर मिळत नाहीत. ग्रामीण अनेक तरुण शहरात नोकरी व रोजगारासाठी गेले आहेत. त्यामुळे गत काही वर्षांपासून मजूर मिळणे कठीण झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना यंत्राच्या साहाय्याने शेती करावी लागत आहे. सध्या खरीप हंगामातील पिके संकटात असून वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
रासायनिक खतांसह कीटकनाशकांच्या किमतीमध्येही दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. अशातच यंत्रमालकांनी भाव वाढविल्याने शेतकऱ्यांना अधिकच फटका बसत आहे. शेतीची कामे करण्याकरिता शेतकऱ्यांना यंत्रांवर अवलंबून राहावे लागत आहे मजुरांसोबतच बैलांची संख्याही कमी झाली आहे.
अशी झाली दरवाढ
• मागील वर्षापेक्षा यावर्षी ट्रॅक्टरच्या भावात वाढ झाली आहे. मागील वर्षी वखरपासचे दर ३५० रुपये होते. तर यावर्षी ४०० रुपये प्रतिएकर आहे. रोटरचे दर मागील वर्षी ८०० रुपये प्रतितास होते. तर यावर्षी ९०० रुपये प्रतितास आहे.
• ग्रामीण भागात बैलाच्य मदतीने शेती करण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. याचा फायदा घेत ट्रॅक्टरसह विविध यंत्र असलेल्य मालकांनी भावात वाढ केली आहे. तसेच अनेकदा शेतकऱ्यांना गरज असताना ट्रॅक्टर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते.
हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी