नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत (पोकरा) शेडनेट योजनेचा लाभ घेतलेल्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील १ हजार ४०० शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांचे शेडनेट जागेवर आहेत की नाही, याबाबतची तपासणी नुकतीच केली.
या पडताळणीत ७० शेतकऱ्यांच्या शेतात शेडनेट नसल्याचे दिसून आले. या बाबीची गंभीर दखल घेत कृषी विभागाने या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून पुढील एक महिन्यात अनुदान परत करण्याचे निर्देश दिले आहेत.
कृषी विभागाने २०१८-१९ यावर्षी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना (पोक्रा) आणली होती. लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी विभागाने पोकरांतर्गत शेडनेट, ठिबक सिंचन सेट, वैयक्तिक शेततळे योजना, मधुमक्षिका पालन, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी शेडनेटसह, कृषी औजारे बँक यासह विविध योजना अंमलात आणल्या.
पोकरा योजनेंतर्गत विविध योजनांचा लाभ घेतलेल्या वस्तूंचा शेतकरी वापर करतात अथवा नाही, याबाबतची तपासणी करण्याचे निर्देश ३१ डिसेंबर रोजी शासनाने कृषी विभागाला दिले होते. त्यानुसार स्थानिक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील संबंधित कृषी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत या योजनेची शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तपासणी मोहीम सुरू केली आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेडनेट योजनेचा लाभ घेतलेल्या १ हजार ४०० शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या शेतात शेडनेट उभे आहेत की नाही, याविषयी तपासणी करण्यात आली. तेव्हा जिल्ह्यातील ७० लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात शेडनेट नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच या लाभार्थी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून एक महिन्यात शेडनेटसाठी शासनाकडून मिळालेल्या अनुदानाची रक्कम परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोकरांतर्गत शेडनेट योजनेचा लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील ७० शेतकऱ्यांच्या शेतात शेडनेट नसल्याचे कृषी विभागाच्या विशेष तपासणी मोहिमेत आढळून आले. तेव्हा या शेतकऱ्यांकडून अनुदान परत घेण्यात येणार आहे. याकरिता शेतकऱ्यांना उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावून अनुदानाची रक्कम परत करण्याच्या सूचना केल्या आहेत. जे शेतकरी अनुदान परत करणार नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल.
-प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक