यंदा संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने खरीप आणि रब्बी पिकांसाठी मोठं संकट निर्माण झालं आहे. तर रब्बीच्या अनेक पिकांसाठी पाण्याची टंचाई भासणार आहे. राज्यातील बहुतांश धरणांमधील सरासरी पाणीसाठी २० टक्क्यांच्या आसपास आहे. जनावरांच्या पाण्याची, रब्बीच्या पिकांची आणि चाऱ्याची मोठी टंचाई यंदाच्या उन्हाळ्यात भासेल. यामुळे उन्हाळी कांद्याची लागवडही शेतकरी हात आखडून करत आहेत.
पुढच्या महिन्यापासून पिकांना देण्यासाठी पाणी कमी पडणार असल्याचं कारण समोर करत उन्हाळी कांदा लागवड केला नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. तर दर नसल्यामुळेही नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कांदा पिकाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
राज्यात किती झाली कांद्याची लागवड?
सध्याच्या रब्बी किंवा उन्हाळी कांद्याच्या लागवडीचा विचार केला तर कोकण विभागात सर्वांत कमी म्हणजे २९ हेक्टर, नाशिक विभागात ७० हजार १९९ हेक्टर, पुणे विभागात १ लाख ५ हजार ७६३ हेक्टर, कोल्हापुर विभागात ३ हजार ८८७ हेक्टर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ हजार ५७० हेक्टर, लातूर विभागात १ हजार ६८४ हेक्टर, अमरावती विभागात १३ हजार १५३ हेक्टर कांद्याची लागवड झाली आहे.
एकूण महाराष्ट्रातील कांदा लावगड विचारात घेतली तर खरीप कांद्याची लागवड ८६ हजार ३४० हेक्टरवर झाली होती. लेट खरिपाची लागवड १ लाख ४१ हजार ७३२ हेक्टर लागवड झाली आहे. तर कृषी विभागाच्या अद्ययावत उपलब्ध माहितीनुसार उन्हाळ किंवा खरिपाची आत्तापर्यंतची लागवड २ लाख ४० हजार ५६० हेक्टर झाली आहे. यंदाच्या वर्षाची संपूर्ण कांद्याची लागवड ही ४ लाख ६८ हजार ६३४ हेक्टर झाली आहे.
अ.क्र | विभाग | खरिप लागवड (हेक्टरमध्ये) | लेट खरिप लागवड (हेक्टरमध्ये) | उन्हाळ/रब्बी लागवड (हेक्टरमध्ये) | यंदाची एकूण लागवड (हेक्टरमध्ये) |
1 | कोकण | ० | ० | २९ | २९ |
2 | नाशिक | १९ हजार ९१९ | ५४ हजार ७२४ | ७० हजार १९९ | १ लाख ४४ हजार ८४३ |
3 | पुणे | ४६ हजार ९९५ | ७५ हजार ९५५ | १ लाख ५ हजार ७६३ | २ लाख २८ हजार ७१४ |
4 | कोल्हापूर | ८१३ | २०७ | ३ हजार ८८७ | ४ जार ९०७ |
5 | छत्रपती संभाजीनगर | ८ हजार ३०० | ८ हजार ९०७ | ४५ हजार ५७० | ६२ हजार ७७८ |
6 | लातूर | ९ हजार ७६९ | १ हजार ९३१ | १ हजार ६८४ | १३ हजार ३८५ |
7 | अमरावती | ५०४ | ८.५ | १३ हजार १५३ | १३ हजार ६६५ |
8 | नागपूर | ३८ | ० | २७२ | ३११ |
संपूर्ण महाराष्ट्र | ८६ हजार ३४० | १ लाख ४१ हजार ७३२ | २ लाख ४० हजार ५६० | ४ लाख ६८ हजार ४३४ |
यंदा पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची सोय नाही. त्यामुळे आम्ही उन्हाळी कांद्याची लागवड केली नाही. पावसाळ्यामध्येच अनेक शेतकऱ्यांनी पाणी विकत घेऊन कांदा जगवला होता, पण काढणीवेळी निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर पडले. सध्या चालू असलेल्या दरामध्ये कांद्याला केलेला खर्चसुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती आहे.- योगेश पोटे (कांदा उत्पादक शेतकरी, येवला)