चालू रब्बीच्या हंगामात यंदा हरभरा आणि ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. त्याचबरोबर मका लागवडीखालील क्षेत्र वाढणे अपेक्षित असताना मागच्या वर्षीच्या तुलनेत मक्याचे क्षेत्र कमी झाले आहे. एकूण रब्बी क्षेत्राच्या ५. ४ टक्के क्षेत्र मका लागवडी खाली आहे. तर यंदा चाऱ्याची टंचाई भासणार असल्याचं लक्षात घेऊन राज्य सरकारने मका आणि ज्वारीचे प्रस्तावित क्षेत्र वाढवले होते.
दरम्यान, कृषी विभागाच्या उपलब्ध अद्ययावत माहितीनुसार आत्तापर्यंत १३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र ११० टक्के एवढे आहे. तर मक्याची २ लाख ५६ हजार ४१९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करणअयात आली असून मागच्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र केवळ ८५ टक्के एवढेच आहे. हरभऱ्याची यंदा सर्वांत जास्त लागवड झाली असून २२ लाख ४४ हजार ३७७ हेक्टर क्षेत्र हरभरा लागवडीखाली असून मागच्या पाच वर्षाच्या तुलनेत हे क्षेत्र १०४ टक्के एवढे आहे.
करडईचा विचार केला तर ३६ हजार ९९३ हेक्टरवर विक्रमी लागवड झाली असून मागच्या वर्षीच्या तुलनेत १२९ टक्के आणि मागील पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत १३९ टक्के करडईची लागवड झाली आहे. तर राज्यात सुर्यफुलाची लागवड सर्वांत कमी झाली असून १ हजार ४४९ हेक्टरवर सुर्यफूल लागवड झाली आहे. हे क्षेत्र मागच्या वर्षीच्या तुलनेत केवळ ३३ टक्के एवढे असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत ३० टक्के एवढे आहे.
रब्बी पीक विमा योजनेचा लाभ
यंदा राज्य सरकारने खरिप पिकासाठी एक रूपयांत विमा योजना लागू केली होती. या योजनेचा लाभ १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी घेतला होता. त्यामध्ये ११३ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित होते. तर रब्बीच्या हंगामातील पिकांसाठीसुद्धा राज्य सरकारने १ रूपयांत पीक विमा योजना लागू केली असून यासाठी ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. रब्बी पिक विमा योजनेमध्ये ४९.५३ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.
पीक परिस्थिती
सध्या हरभरा, गहू, ज्वारी आणि मका हे पीके जोमात आहेत. हरभरा पीक फांद्या फुटणे ते फुलोऱ्यात तर काही ठिकाणी घाटे भरण्याच्या अवस्थेत, गहू मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी ओंब्या लागण्याच्या अवस्थेत आहे, ज्वारीचे पीक पोटऱ्यात असून काही ठिकाणी कणसे लागण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी हुरड्याच्या अवस्थेत आहे. करडई पीक वाढीच्या अवस्थेत आहे.
किड व रोग
राज्यभरातील रब्बी हंगामाचा विचार केला तर ज्वारी पिकावर लष्करी अळीचा आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर मक्यावर लष्करी अळी, हरभरा पिकावर घाटे अळी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
राज्याचा एकूण पिकपेरा क्षेत्र आणि त्याची टक्केवारी
पीक | पाच वर्षाचे सरासरी क्षेत्र (क्षेत्र हेक्टरमध्ये) | मागील वर्षाचे पेरणी क्षेत्र (क्षेत्र हेक्टरमध्ये) | या वर्षीची प्रत्यक्ष पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये) | या वर्षीच्या पेरणीचा मागील पाच वर्षाच्या क्षेत्राशी टक्केवारी (क्षेत्र हेक्टरमध्ये) | यावर्षीच्या पेरणीची मागील वर्षीच्या क्षेत्राशी तुलना (क्षेत्र हेक्टरमध्ये) |
ज्वारी | १७ लाख ५३ हजार ११८ | १२ लाख २२ हजार ००५ | १३ लाख ४० हजार ०३७ | ७६.४४ | ११० |
मका | २ लाख ५८ हजार ३२१ | ३ लाख २ हजार ९४७ | २ लाख ५६ हजार ४१९ | ९९.२६ | ८५ |
हरभरा | २१ लाख ५२ हजार ०१४ | २५ लाख ८६ हजार ६१५ | २२ लाख ४४ हजार ३७७ | १०४.२९ | ८७ |
गहू | १० लाख ४८ हजार ८०७ | ९ लाख १ हजार ९८३ | ७ लाख ४७ हजार १४० | ७१.२४ | ८३ |
करडई | २६ हजार ६५७ | २८ हजार ७६१ | ३६ हजार ९९३ | १३८.७७ | १२९ |
एकूण तेलबिया | ५५ हजार ६६० | ५२ हजार २४१ | ५२ हजार ६६८ | ९४.६२ | १०१ |
एकूण तृणधान्ये | ३० लाख ७१ हजार ५४२ | २४ लाख ३४ हजार २९३ | २३ लाख ४९ हजार ६६८ | ७६.५० | ९७ |
एकूण अन्नधान्ये | ५३ लाख ४१ हजार ३१० | ५१ लाख ३९ हजार ५०४ | ४६ लाख ७९ हजार ४० | ८७.६० | ९१ |
महाराष्ट्र एकूण | ५३ लाख ९६ हजार ९६९ | ५१ लाख ९१ हजार ७४६ | ४७ लाख ३१ हजार ७०८ | ८७.६७ | ९१ |