पुणे : मागच्या काही वर्षांमध्ये ग्रामीण जनजीवनात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजीटलायझेशनमुळे ग्रामीण संस्कृतीत झपाट्याने बदल होऊन ग्रामीण भाग मुख्य प्रवाहात आला आहे. ज्याप्रमाणे मुलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा गोष्टी खेडोपाडी पोहोचल्या त्याचप्रमाणे ग्रामीण संस्कृतीनेही आता आधुनिकतेची झालर पांघरली असल्याने लोकांच्या जगण्यात आणि वागण्यात बदल झाले आहेत.
मागच्या दहा वर्षांचा विचार केला तर ग्रामीण भागातील नागरिकांच्या खाण्यातील पदार्थांमध्येही काहीसा बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण भागातील पदार्थांमध्ये भाकरीचे प्रमाण कमी होऊन त्याची जागा चपातीने घेतली असल्याचं दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे ज्वारीचे कमी झालेले आणि गव्हाचे वाढलेले उत्पादन.
दरम्यान, मागच्या दहा वर्षांत ज्वारीचे उत्पादन जवळपास ५० टक्क्यांनी घटले आणि ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्र हे ५५ ते ५८ टक्क्यांनी घटले आहे. तर गव्हाचे उत्पादन हे २०१२-१३, २०१३-१४ आणि २०१४-१५ साली अनुक्रमे ११.९९ लाख टन, १४.८० लाख टन, आणि १३ लाख टन एवढे होते. या उत्पादनात वाढ झाली असून २०२२-२३ साली गव्हाचे उत्पादन हे २३ लाख टन एवढे झाले आहे. म्हणजे गव्हाचे उत्पादन हे मागच्या दहा वर्षांच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढले आहे.
म्हणजेच राज्याचा ज्वारीचा वाटा हा ५० टक्क्यांनी घटला असून गव्हाचा वाटा ५० टक्क्यांनी वाढला आहे. तर बाजरीचा टक्का हा तेवढाच असल्याचं मागच्या १० वर्षाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे ज्वारीच्या भाकरीची जागा ही चपातीने घेतल्याचं सिद्ध होत आहे.
का झालाय बदल?
भाकरी ही जास्तीत जास्त ग्रामीण भागात खाल्ली जायची. पण मागच्या दहा वर्षांचा विचार केला तर झपाट्याने तंत्रज्ञान बदलत असून ग्रामीण जनजीवनही बदलले आहे. तर शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामीण लोकांच्या राहणीमान आणि खाद्यसंस्कृतीही बदलू लागल्या आहेत. ज्या कुटुंबात केवळ सणावाराला किंवा कधीतरीच चपाती खाल्ली जायची त्या कुटुंबात सध्या दररोज किंवा एका दिवसाआड चपाती खाल्ली जात असल्याचं चित्र आहे.
ज्वारीच्या आणि गव्हाच्या मागील दहा वर्षातील उत्पादनाचा अंदाज
वर्षे | ज्वारीचे उत्पादन (लाख टनांमध्ये) | गव्हाचे उत्पादन (लाख टनांमध्ये) |
२०१३-१४ | २८ | १४ |
२०२१-२२ | २१ | २१ |
२०२२-२३ | १५ | २३ |