अमरावती विभागाला पुरवठा होणाऱ्या ५७ लाख बीटी बियाणे पाकिटांच्या तुलनेत फक्त दीड टक्के प्रमाण असणाऱ्या विशिष्ट वाणाच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांमध्ये गर्दी होत आहे. या वाणाचे बियाण्यांचा स्टॉक संपल्याचे कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या संघटनेद्वारा कृषी विभागाला लेखी पत्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे या बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी विभागात १०.७१ लाख हेक्टर क्षेत्रात बीटी कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी विभागाद्वारा ५६,९३,६०० पाकिटांची मागणी विविध कंपन्यांकडे नोंदविण्यात आलेली आहे. त्यातुलनेत ३१.७७ लाख पाकिटे उपलब्ध झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे.
हंगामपूर्व कपाशी लागवड झाल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दरवर्षी १ जूनपर्यंत बीटी बियाण्यांच्या विक्रीस प्रतिबंध राहायचा. यावर्षी मात्र १६ मेपासून विक्रीची परवानगी दिल्याने मागणी असणाऱ्या वाणांच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली.
अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यात त्या वाणाचे १.७६ लाख पाकिटे तर अमरावती जिल्ह्यात ९० हजार पाकिटांचा पुरवठा झाला व संपलादेखील. त्या तुलनेत अन्य वाणांचे मुबलक बियाणे बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाचे बियाण्यांचा आग्रह धरू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
त्या बियाण्यांचे रेशनिंग, अन्य बियाणे उपलब्ध
* त्या विशिष्ट वाणाचे बीटी बियाणे उपलब्ध असलेल्या कृषी केंद्रात कृषी सहायकांच्या उपस्थितीत प्रति शेतकरी दोन पाकिटे याप्रमाणे विक्री करण्यात आली. आता तो स्टॉक संपला आहे.
* अन्य कंपन्यांचे अमरावती जिल्ह्यात १५,०६,६००, यवतमाळ २३,८०,४००, अकोला ६,७७,५००, वाशिम १,५४,१०० व बुलडाणा जिल्ह्यात ९,७५,००० पाकिटांची मागणी आहे.
प्रशासनाचे काय म्हणणे?
बियाणे व रासायनिक खतांच्या आढळण्यास कुणाचाही मुलाहिजा केल्या जाणार नाही. वाढीव दराने विक्री किंवा लिकिंग आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहे.-सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती
त्या विशिष्य वाणाच्या पल्याचे पत्र विक्रेत्यांच्या संघटनेद्वारा देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी त्याच वाणासाठी आग्रह करू नये, अन्य कंपन्यांचे बियाण्यांचे गुणधर्म, उत्पादकतादेखील सारखीच आहे.-किसनराव मुळे, विभागीय सहसंचालक (कृषी)