Maharashtra Sowing : मान्सूनचा पाऊस सुरू होऊन जवळपास दीड महिना झाला असून राज्यातील बहुतांश भागातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्या भागात पाऊस उशीरा पोहोचला आहे अशा भागांतील पेरण्या बाकी आहेत. तर मका आणि सोयाबीन या महत्त्वाच्या पिकाखालील पेरणी क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे.
(Maharashtra Latest Sowing Report)
दरम्यान, मान्सूनच्या पावसामध्ये मागील एका आठवड्यापूर्वी मोठा खंड पाहायला मिळाला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या लांबल्या होत्या. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पेरण्यांना वेग आला आहे. १० जुलैपर्यंत राज्यातील एकूण १ कोटी १६ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहे.
यंदा राज्यातील एकूण १ कोटी ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या अपेक्षित असून त्यातील ८१.९४ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर अमरावती विभागात सर्वांत जास्त म्हणजे २७ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्याचबरोबर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासही सुरूवात केली असून यंदाही सरकारने १ रूपयांत पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत आहे.
कोणत्या विभागात किती झाली पेरणी?
- कोकण विभाग - ९६ हजार ८७९ हेक्टर
- नाशिक विभाग - १६ लाख ५७ हजार हेक्टर
- पुणे विभाग - १० लाख ८४ हजार हेक्टर
- कोल्हापूर विभाग - ५ लाख ३९ हजार हेक्टर
- छत्रपती संभाजीनगर विभाग - १९ लाख ४४ हजार हेक्टर
- लातूर विभाग - २५ लाख ४६ हजार हेक्टर
- अमरावती विभाग - २७ लाख ५८ हजार हेक्टर
- नागपूर विभाग - १० लाख १० हजार हेक्टर
- एकूण क्षेत्र -१ कोटी १६ लाख ३८ हजार हेक्टर