Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा आखाडा तापू लागला आहे. उमेदवारांसह समर्थकांकडून मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या उमेदवाराची जमेची बाजू सांगण्यासाठी खटाटोप सुरू आहे.
परंतु, उमेदवार सांगतील अन् मतदार ऐकून घेतील, असे चित्र यावेळेसच्या विधानसभेत दिसत नसून, प्रचारासाठी आलेल्या उमेदवारांवर प्रश्नाची सरबत्ती करण्यात येत आहे. प्रामुख्याने शेतमालाच्या पडत्या भावाचा मुद्दा कळीचा ठरत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे चित्र ४ नोव्हेंबर रोजी स्पष्ट झाले. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीसह काहींनी बंडखोरी करीत निवडणूक रिंगणात उडी घेतली. प्रामुख्याने बंडखोर उमेदवारांमुळे निवडणूक आखाड्यात रंगत आली आहे.
शिवाय अपक्षांचीही संख्या मोठी असल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना प्रचारासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. रात्रं-दिवस एक करून शहरांसह ग्रामीण भागातील मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला जात आहे.
प्रचारादरम्यान उमेदवारांकडून स्वपक्षीय नेत्यांची तर कार्यकर्ते, समर्थकांकडून आपल्या उमेदवाराची जमेची बाजू मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. परंतु, मतदारांकडूनही उलट प्रश्न केले जात असून, वाढती महागाई, बेरोजगारीचा प्रश्न तसेच प्रामुख्याने शेतमालाचे पडते भाव यावरून उमेदवारांसह समर्थकांना कात्रीत पकडले जात आहे. अशा परिस्थितीमुळे काही ठिकाणी प्रचारकर्त्यांना निरुत्तर होत पुढचे गाव गाठावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लागवड खर्चाच्या तुलनेत भाव मिळावा...
अलीकडच्या काळात बी-बियाणांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यातच मजुरीही वाढली आहे. अशा परिस्थितीत शेतमालाला मात्र कवडीमोल भाव दिला जातो. परिणामी, लागवडही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोईवरील कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. त्याला आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागत आहे. याकडे मात्र कुणाचेच लक्ष जात नसल्याचे मत मतदारांतून व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना कुणी वाली नाही...
जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांकडे पाहिले जाते. परंतु, त्यांच्या प्रश्नाची, अडचणीची जाण कुणालाच नाही. शेतमालाचे भाव कायम पडते आहेत. भाववाढीसाठी प्रयत्न होत नसल्याने काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल नाईलाजास्तव कवडीमोल दरात विक्री करावा लागतो. येणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - काशीराम कन्हाळे, शेतकरी
मदत नको; शेतमालाला भाव द्या...
सरकारकडून मदतीची आश्वासने दिली जातात अन् ती हवेतच विरतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाला लागवड खर्चाच्या तुलनेत, समाधानकारक भाव दिल्यास कोणत्याच मदतीची गरज भासत नाही, हे शासनाने लक्षात घेतले पाहिजे. परंतु, तसे होत नाही. वर्षानुवर्षापासून शेतकऱ्यांना केवळ आशेवर झुलवत ठेवण्याचे काम राज्यकर्ते करतात. - रामेश्वर कव्हळे, शेतकरी
लागवड खर्चाच्या तुलनेत भाव हवा
अलीकडच्या काळात लागवड खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. तर दुसरीकडे शेतमाल कवडीमोल दरात विकावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकयांना लागवडही वसूल होत नाही. परिणामी, शेतकऱ्याने कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शेतमालाला समाधानकारक भाव अपेक्षित आहे. - नंदू कहाळे, शेतकरी
कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ
एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांचा सामना करून शेती पिकवावी लागते. परंतु, शेतकऱ्यांच्या कष्टाची कुणालाच किंमत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. शेतमालाचे एवढे भाव पडलेत की लागवड खर्चही वसूल होत नाही. या ना त्या हंगामात कर्जाचा डोंगर उतरेल, अशी आशा असते. परंतु, शेतमालाला भाव मिळत नसल्याने कर्ज कमी होण्याऐवजी वाढत जात आहे. - शिवाजी फटांगळे, शेतकरी