पुणे : खते आणि बियाणे खरेदीमध्ये काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने पावले उचलूनही राज्यामध्ये बियाणे विक्रीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचं समोर येत आहे. अनेक ठिकाणी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने कापूस बियाणांची विक्री होत असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना दिसत आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये सर्रासपणे कापूस बियाणांची जास्त दराने विक्री होत आहे. बीजी-२ बियाणांसाठी केंद्र सरकारने ८६४ रूपये प्रतिपॅकेट हा दर ठरवून दिला असतानाही कृषी सेवा केंद्रे किंवा बियाणे विक्रेत्यांकडून बियाणाच्या एका पिशवीचे ११०० ते १२०० रूपये घेतले जात आहेत. त्याचबरोबर ठराविक वाणासाठी जवळपास १८०० रूपयांपर्यंत किंमत आकारली जात आहे. पण शेतकऱ्यांनी बिल हे ८६० रूपयांचेच दिले जात असल्याची माहिती आहे.
कृषी विभागाकडून मोहीम
बियाणे विक्रीतील काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत असून जिथे गोंधळ होतो किंवा बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते अशा कृषी सेवा केंद्रावर कृषी सहाय्यकाच्या निगराणीखाली बियाणांची विक्री करण्याचे आदेश कृषी विभागाने काढलेले आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त दराने कापूस बियाणे खरेदी करावे लागते अशा शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागाकडे तक्रारी कराव्यात असंही सांगण्यात आलं आहे.
"बिलापेक्षा पैसे जास्त द्यावे लागतील..."
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील एका शेतकऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, "आम्ही मोंढ्यामध्ये असलेल्या एका कृषी सेवा केंद्रावर कापूस बियाणे घेण्यासाठी गेलो होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला ११०० रूपये एका पॅकेटची किंमत सांगितली. दुसऱ्या कंपनीचे बियाणे अजूनही महाग होते. पण आम्ही एका खासगी कंपनीचे बियाणे विकत घेतले. आमच्याकडून त्यांनी ११०० रूपये घेतले पण बिल मात्र ८६० रूपयांचे दिले. आम्ही असे का? म्हणून विचारले असता ते म्हणाले की, बिल एवढंच मिळणार आणि पैसे जास्त द्यावे लागणार... तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर घेऊ नका. "
दरम्यान, अशी स्थिती मराठवाड्यातच नाही तर इतर भागांतसुद्धा आहे. पण अशा दुकानदारांवर कृषी विभागाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. शेतकऱ्यांमध्येही यासंदर्भात कोणतीच जागृती नसल्यामुळे शेतकरी तक्रारी करत नाहीत. परिणामी अशा भ्रष्ट कारभारामुळे शेतकरी भरडले जात आहेत.