Join us

तिजोरीत पैसे असूनही कापूस सोयाबीन अनुदान वाटप मंदावले! शेतकऱ्यांना का मिळेनात पैसे?

By दत्ता लवांडे | Published: October 21, 2024 9:03 PM

Cotton Soybean Subsidy : पहिल्याच टप्प्यात जवळपास ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना २ हजार ३९८ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. पण त्यानंतर अनुदान वाटपाची गती

Cotton Soybean Subsidy : राज्य सरकारने मागील हंगामातील म्हणजे २०२३ च्या खरिपातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना प्रतिहेक्टरी ५ हजार रूपयांचे अनुदान जाहीर केले होते. दोन हेक्टरच्या मर्यादेत सरकारने ३० सप्टेंबर रोजी या अनुदानाच्या वाटपाला सुरूवात केली. पहिल्याच टप्प्यात जवळपास ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार ३९८ कोटी रूपये वर्ग करण्यात आले होते. पण त्यानंतर अनुदान वाटपाची गती मंदावली आहे.

पहिल्या १० दिवसांत म्हणजे १० ऑक्टोबरपर्यंत राज्यातील ६७ लाख ६१ हजार खातेदारांना आणि ५७ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना एकूण २ हजार ५६४ कोटी रूपयांचे वाटप झाले होते. पण त्यानंतरच्या १० दिवसांत म्हणजे २० ऑक्टोबरपर्यंत केवळ २५ कोटी रूपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. राज्य सरकारने अनुदानापोटी ४ हजार १९४ कोटी रूपये कृषी विभागाच्या खात्यावर जमा केले आहेत. पण या अनुदान वाटपाची गती आणि समंतीपत्रासाठीच्या अडचणी पाहता येणाऱ्या काळात हा पैसा शासनाच्याच खात्यात पडून राहण्याची शक्यता आहे. 

कापूस-सोयाबीनच्या अनुदानासाठी ९६ लाख पात्र खातेदार आहेत. त्यातील ८० लाख वैयक्तिक तर १६ लाख संयुक्त खाते आहेत. ८० लाख वैयक्तिक खात्यांपैकी ६४ लाख खातेदारांचे आधार संमतीपत्र कृषी विभागाला प्राप्त झाल्याची माहिती आहे. तर उर्वरित १६ लाख संयुक्त खातेदार आणि १७ लाख वैयक्तिक खातेदारांचे संमतीपत्र कृषी विभागाला मिळालेले नाहीत.

काय येतायेत अडचणी?अनुदान वाटपासाठी अगोदर घातलेली ई-पीक पाहणीची अट सरकारने वगळली असली तरीही या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी खातेदारांनी कृषी सहाय्यकाकडे आधार समंतीपत्र देणे बंधनकारक आहे. पण अनेक खातेदार बाहेरगावी असल्यामुळे संमतीपत्र देऊ शकले नाहीत. तर संयुक्त खातेदारांतील एकमेकांच्या वादामुळे त्यांचेही समंतीपत्र आलेले नाहीत. संयुक्त खातेदारांपैकी एकाच खातेदारांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे सर्व खातेदारांनी सह्या करून कुणाच्या खात्यावर पैसे जमा करायचे आहेत हे ठरवून संमतीपत्र द्यायचे आहे. पण खातेदारांच्या अंतर्गत वादामुळे आणि एकमत होत नसल्यामुळे जवळपास ९५  टक्क्यांपेक्षा जास्त खातेदारांनी अजून संमतीपत्र दिलेले नाहीत. 

जसजसे शेतकरी समंतीपत्र देतील तसे त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात संमतीपत्र जमा केलेल्या सर्वांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले पण त्यानंतर संमतीपत्र जमा होत नसल्यामुळे अनुदान वाटपाची गती मंदावली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे पैसे सरकारच्या तिजोरीत पडून राहण्याची शक्यता आहे.

आत्तापर्यंत एकूण वाटप (२१ ऑक्टोबरची आकडेवारी)

  • खातेदार - ६७ लाख 
  • रूपये वाटप - २ हजार ५८९ कोटी ७७ लाख रूपये

 

Solar Energy : सौरउर्जा प्रकल्पाला साखर कारखान्यांकडून अल्प प्रतिसाद! मिळू शकते वार्षाकाठी एका कोटींचे उत्पन्न

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनकापूसशेतकरी