पुणे : मान्सूनच्या पावसाने अर्धा महाराष्ट्र काबीज केला असून छत्रपती संभाजीनगरपर्यंत मान्सून पोहचला आहे. अजून दोन ते तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस पडेल. शेतकऱ्यांनी या हंगामातील पेरण्याची आणि लागवडीची तयारी सुरू केली आहे. तर काही भागांतील पेरण्या आणि लागवडी पूर्णही झाल्या आहेत. पण शेतकऱ्यांची ही घाई कदाचित अंगलट येऊ शकते.
कारण, अनेक शेतकऱ्यांनी ओल कमी असतानासुद्धा पावसाच्या भरवश्यावर पेरण्या आणि लागवडी केल्या आहेत. तर मान्सूनच्या पावसाचा जोर हा १५ जूननंतर कमी होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. जर असे घडले तर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांची वेळ येणार आहे. अशा अवस्थेमध्ये कृषी विभागाला मोठ्या प्रमाणावर बियाणांची आवश्यकता भासेल.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात गरजेपेक्षा जास्त बियाणे उपलब्ध आहे. पण दुबार पेरण्यांची वेळ आली तर शेतकऱ्यांना जवळपास ५० टक्क्यांनी अधिक बियाणांची गरज भासेल, तेवढे बियाणे कृषी विभागाकडून ऐनवेळेला उपलब्ध होणार नाही. परिणामी राज्यामध्ये बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
शेतकऱ्यांनी काय करावे?अनेक शेतकऱ्यांनी धूळफेक पेरणी किंवा कमी ओलीमध्ये पेरणी केली आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पेरणी केली नाही त्यांनी पूर्णपणे ओल असल्याशिवाय केवळ पावसाच्या भरवश्यावर पेरणी करण्याचे धाडस करू नये असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, जुलै महिन्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
किती बियाणे उपलब्ध?यंदाच्या हंगामात राज्यातील एकूण अपेक्षित पेरणी क्षेत्र हे १४७.७७ लाख हेक्टर असून बियाणे बदल दरानुसार बियाण्यांची गरज ही १९.२८ लाख क्विंटल एवढी आहे. त्यामध्ये महाबीजकडून ३.७६ लाख क्विंटल, राष्ट्रीय बीज निगमकडून ०.५९ लाख क्विंटल आणि खासगी बियाणे संस्थांकडून २०.६५ लाख क्विंटल अशा एकूण २५.०६ लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पिक असून अपेक्षित पेरणी क्षेत्र ५०.७० लाख हेक्टर एवढे आहे. या क्षेत्राकरिता १३.३१ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून १८.४६ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यानंतर कापूस पिकाचे ४० लाख हेक्टर क्षेत्र असून याकरिता ०.९५ लाख क्विंटल बियाणे गरज आहे व ०.९७ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
भात पिकाचे १५.९१ लाख हेक्टर क्षेत्र असून याकरिता २.२९ लाख क्विंटल बियाणे गरज आहे, व २.५५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. मका पिकाचे ९.८० लाख हेक्टर क्षेत्र असून, याकरिता १.४७ लाख क्विंटल बियाणे गरज आहे, व १.६० लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तुर, मुग, उडीद या कडधान्य पिकांचे एकुण क्षेत्र १९.०० लाख हेक्टर क्षेत्र असून याकरिता ०.८२ लाख क्विंटल बियाणे गरज आहे व ०.९१ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
तसेच इतर पिकाखालील एकुण १२.३६ लाख हेक्टर क्षेत्र असून याकरिता ०.४४ लाख क्विंटल बियाणांची गरज आहे व ०.५२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. पेरणीक्षेत्रानुसार राज्यात सद्यस्थितीत गरजेपेक्षा जास्त बियाणे उपलब्ध असून बियाण्यांची टंचाई नाही.