Join us

Maharashtra Farming : मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदाचा खरीप हंगाम सरसच! पेरणी क्षेत्र वाढले

By दत्ता लवांडे | Published: October 10, 2024 5:26 PM

Maharashtra Farming : यंदाच्या खरीप हंगामात मात्र राज्यातील सोयाबीनचे क्षेत्र लक्षणीय वाढले असून पारंपारिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल कमी असल्याचं दिसून येत आहे.

पुणे : राज्यातील खरीप हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात आहेत. सोयाबीनची काढणी आवरत आली असून काही ठिकाणी रब्बीची तयारी सुरू झाली आहे. तर काही भागांतील बाजरी, मुगाची काढणी बाकी आहे. कापसाच्या वेचणीला सुरूवात झाली असून तूर शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. राज्यात यंदा मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यामुळे पिके डौलदार असून मागील पाच वर्षाच्या खरीप हंगामाशी तुलना केली तर यंदाचा खरीप हंगाम सरस ठरला आहे. 

दरम्यान, यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १०३ तर मागील पाच वर्षांच्या तुलनेत १०२.६७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाच वर्षांची तुलना केली तर राज्यात १ कोटी ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी १ कोटी ४० लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. पण यावर्षी राज्यात मान्सूनचा चांगला पाऊस बरसल्याने १ कोटी ४५ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. 

यामध्ये पुणे विभागातील पेरणीखालील क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे विभागात ५ वर्षांच्या तुलनेत १३६ टक्के तर मागील वर्षीच्या तुलनेत १२१ टक्के पेरणीखालील क्षेत्र वाढले आहे. तर कोकण विभागात सर्वांत कमी म्हणजे मागील पाच वर्षांच्या तुलनेत ८४.९९ टक्के तर मागील वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. त्यापाठोपाठ कोल्हापूर विभागात मागील वर्षीच्या तुलनेत १२१ टक्के पेरण्या झालेल्या आहेत.

मात्र, पिकनिहाय विचार केला तर खरीप ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय घट झाली असून सरासरीच्या केवळ ३७ टक्के पेरणी झाली आहे. बाजरीची पेरणी सरासरीच्या ६० टक्के, मुगाची पेरणी सरासरीच्या ६० टक्के तर रागीची पेरणी सरासरीच्या ८७ टक्के पेरणी झाली आहे. मक्याचे क्षेत्र वाढले असून सरासरीच्या १२७ टक्के पेरणी झाली आहे. तीळ आणि कारळांची पेरणी सरासरीच्या तुलनेत केवळ ३० टक्के क्षेत्रावर झाली आहे. विशेष म्हणजे सोयाबीनची पेरणी ही सरासरीच्या १२४ टक्के झाली आहे. 

टॅग्स :शेतकरीशेती क्षेत्रपीकमहाराष्ट्र