मागच्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारने १ हजार ८५१ कोटी रूपयांची मदत जाहीर केली असून त्यासंबंधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी काल अधिवेशनामध्ये केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून दिलासा मिळणार आहे.
"गारपिटीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे सुरू असून ३२ पैकी २६ जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. विदर्भ - मराठवाड्यातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया,अमरावती, अकोला, परभणी या जिल्ह्यांतील पंचनामे बाकी आहेत. या नुकसानीमध्ये ९ लाख ७५ हजार ५९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यासाठी दोन हजार कोटींची रक्कम देय आहे. सध्याच्या एसडीआरएफच्या निकषानुसार १ हजार १७५ कोटींची मदत द्यावी लागली असती सरकारने १ हजार ८५१ कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केली जाणार आहे" अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितली आहे.
शेतकऱ्यांना नुकसानीची किती मिळणार भरपाई?
- जिरायती शेतीसाठी - १३ हजार ६०० रूपये प्रतिहेक्टर
- बागायती शेतीसाठी - २७ हजार रूपये प्रतिहेक्टर
- बहुवार्षिक पिकांसाठी - ३६ हजार रूपये प्रतिहेक्टर
त्याचबरोबर जानेवारी ते ऑक्टोबरच्या दरम्यान इतर नैसर्गिक संकटामुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीसाठी १ हजार ७५७ कोटी रूपयांची भरपाई देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
भरपाईवरून विरोधकांची टीका
मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत ही कमी आहे. पूर्ण पीक वाया गेलं असतानाही सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार शेतकऱ्यांना एकरी केवळ पाच ते साडेपाच हजार रूपयांची मदत मिळणार आहे. हे आकडे बघितले तर नुकसान आणि भरपाईमध्ये मेळ बसत नाही म्हणून विरोधकांनी सरकारवर टीका केली.