पुणे : खरिपात पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवल्यानंतर रब्बी हंगामासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. यंदा पावसाच्या कमतरतेमुळे पिके जगवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असून उन्हाळा कोरडा जाणार आहे. तर रब्बीसाठी राज्याकडे आवश्यकतेनुसार खतांची उपलब्धता कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कमतरता भासणार आहे. पेरण्या तोंडावर आल्या असताना राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत रब्बी हंगामपूर्व आढावा बैठक पुण्यातील साखर संकुल येथे पार पडली. यावेळी चाऱ्याच्या अभावामुळे यंदा चारा पिकांवर भर देण्यात येणार असून ज्वारी आणि मक्याचे प्रस्तावित क्षेत्र वाढवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर पाण्याची उन्हाळी आवर्तनेही कमी करण्यात येणार असून शेतकऱ्यांना मोठा ताण सहन करावा लागणार आहे.
दरम्यान, मातीत वापसा कमी असल्यामुळे पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून सध्या खतांची गरज आहे. राज्यात मागच्या तीन वर्षातील सरासरी वापर हा २६.९० लाख मेट्रीक टन एवढा होता. तर यावर्षी २९.६० लाख मेट्रीक टन एवढा खतांचे नियोजन आहे. पण राज्यात सध्याचा उपलब्ध साठा फक्त १६.७४ लाख टन एवढाच असून ४३ टक्के खतांची कमतरता आहे.
राज्यात युरियाची गरज १० लाख टनांची असून केवळ ३.६२ लाख टन युरियाचा साठा उपलब्ध आहे. डीपी खताची आवश्यकता २.५० लाख टन असून १.७० लाख टन साठा उपलब्ध आहे. संयुक्त खते एसएसपी यांची आवश्यकता अनुक्रमे ११ आणि ५ लाख टनांची असून साठा केवळ ७.९० आणि २.९३ लाख टन एवढाच आहे. त्यामुळे केंद्राने मंजूर केलेल्या कोट्यावर लक्ष असणार आहे.
केंद्र सरकारकडून कोटा जाहीर
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील येणाऱ्या रब्बी हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या २९.६० लाख मेट्रीक टन खतांचा कोटा मंजूर केला आहे. पण अनेकदा मंजूर केलेल्या कोट्यातील खत राज्याला मिळाले नाही, त्यामुळे या हंगामात केंद्राकडून मंजूर केलेला कोटा राज्याला देण्यात येणार की नाही यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.