पुणे : राज्यात यंदा मान्सूनने जोरदार हजेरी लावल्याने रब्बी पिकांची आतापर्यंत ६५ टक्के अर्थात ३५ लाख २१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारी पिकाची पेरणी ११ लाख १५ हजार हेक्टर, हरभरा पिकाची १७ लाख १० हजार हेक्टर, तर गव्हाची पेरणी १ लाख ८४ हजार हेक्टर झाली आहे.
लातूर विभागात आतापर्यंत ८७ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वांत कमी १० टक्के पेरण्या कोकण विभागात झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच तारखेला २३ लाख ९९ हजार ३ हेक्टरवर पेरणी झाली होती.
राज्यात रब्बी पिकाखालील सरासरी क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर इतके असून, यंदा मान्सून चांगला बरसल्याने रब्बी पिकांखालील क्षेत्रात किमान १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
राज्यात आतापर्यंत ३५ लाख २१ हजार ६५५ हेक्टर अर्थात ६५.२५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात ज्वारी पिकाचे क्षेत्र १७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर असून, आतापर्यंत ११ लाख १५ हजार ११९ हेक्टर अर्थात ६३.६१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
राज्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख ४८ हजार ८०७ हेक्टर असून, आतापर्यंत ४ लाख ४२ हजार १३४ हेक्टर अर्थात ४२.१६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. हरभरा पिकाखालील सरासरी क्षेत्र २१ लाख ५२ हजार १४ हेक्टर असून, आतापर्यंत १७ लाख १० हजार ४२४ अर्थात १९.४८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
तर मक्याचे सरासरी क्षेत्र २ लाख ५८ हजार ३२१ हेक्टर असून, आतापर्यंत १ लाख ७८ हजार ५०० हेक्टरवर अर्थात ६९.१० टक्के पेरणी झाली आहे.
लातूर पाठोपाठ संभाजीनगर अव्वल
■ विभागनिहाय पेरणी क्षेत्र लक्षात घेता आतापर्यंत लातूर विभागात सर्वाधिक ८७ टक्के अर्थात ११ लाख ८८ हजार ८६६ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
■ संभाजीनगर विभागात ८०, अमरावती विभागात ७८, कोल्हापूर विभागात ६३, तर पुणे विभागात ५५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
■ नागपूर विभागात २९, नाशिक विभागात २५, तर कोकण विभागात सर्वात कमी १० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
अधिक वाचा: Rabi Pik Vima : पिकांसाठी हजारोंचा खर्च होतोय तेवढा १ रुपयाचा पिक विमा काढा की