Maharashtra Heavy Rain Latest Updates : राज्यभरातून मान्सूनच्या पावसाने काढता पाय घेतल्यानंतरही राज्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील आठवड्यामध्ये मान्सूनचा पाऊस पूर्ण राज्यातून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली. पण राज्यात त्यानंतरही पाऊस सुरू असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. विशेषतः या पावसामुळे खरिपात लागवड केलेल्या आणि काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. तर भाजीपाला पिके, मका, फुले, कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. तर बिगरहंगामी पिकांचेही नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.
सध्या राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर पट्ट्यात प्रचंड वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. तर कांद्याच्या नर्सरींचे नुकसान झाले आहे.
बिगरमोसमी पावसामुळे रस्त्यावर आणि शेतात पाणी साठले आहे. तर नाशिक पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरल्याने लाखोंच्या कांद्याचा चिखल झाला आहे. अनेक ठिकाणी कापूस, मका, भाजीपाला आणि कांदा पिकांमध्ये पाणी साठल्याने पीके सडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर नुकसानीला सामोरं जावं लागत आहे.