Maharashtra Rain Update :
मुंबई :
मुंबई, पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी बुधवारी संध्याकाळी पावसाने दाणादाण उडविल्यानंतर गुरुवारीदेखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, तुलनेने पावसाचा जोर कमी राहिल्याने नागरिकांनी सुटकेचा निः श्वास सोडला.
मराठवाडा, विदर्भ तसेच खान्देशातील काही जिल्हांत मात्र मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातही पाऊस झाला. विदर्भात यवतमाळ, वर्धा, अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर होता.
दुपारी विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस कोसळला. यवतमाळ, वणी, पांढरकवडा, कळंब, बाभूळगाव या तालुक्यांत दमदार सरी कोसळल्या.
अमरावती शहरासह तिवसा, अचलपूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यातील २६ मंडळांत बुधवारी रात्रीतून जोरदार पाऊस झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७, जालन्यातील ३, बीडमधील १, नांदेड जिल्ह्यातील दोन मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मराठवाड्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून ११७ टक्के नोंद झाली आहे.
पंतप्रधानांचा दौरा रद्द; आता २९ ला करणार ऑनलाईन लोकार्पण
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारचा पुणे दौरा मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. या दौऱ्यात पुण्यातील मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण आणि भूमीपूजन तसेच सोलापूर विमातळ आणि इतर विकास कामांचे उद्घाटनही होणार होते. आता भुयारी मार्गाचे लोकार्पण आणि इतर कामांचे उद्घाटन २९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी ऑनलाईन करणार आहेत.
खान्देशात शेतात पाणी
जळगाव, धुळे जिल्ह्यातील अनेक भागांना पावसाने झोडपले. यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले.
वीज पडून दोघांचा बळी
धुळे जिल्ह्यातील घाणेगाव (ता. साक्री) येथील शेतकरी विक्रम महाले (६०) या शेतकऱ्याचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. वर्धेतील सेलू येथे शेतात काम करीत असलेल्या मंदा वाघमारे (५५, रा. जुवाडी) या मृत्युमुखी पडल्या.