राज्यात सोमवारपर्यंत (दि. ३) १४०.९ मिमी पाऊस झाला असून तो सरासरी पर्जन्यमानाच्या (२३९.६ मिमी) ५८.८ टक्के इतका आहे. तर खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून आतापर्यंत ९.४६ लाख हेक्टरवर (अर्थात ७ टक्के) पेरणी झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास राज्यात पेरणीच्या कामास वेग येईल, अशी आशा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
खरीप हंगामासाठी १९.२१ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून सद्यस्थितीत २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तर आतापर्यंत १५ लाख ९२ हजार ४६६ क्विंटल अर्थात ८२ टक्के बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. राज्यात याच हंगामासाठी ४३.१३ लाख टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत ४४.१२ लाख टन खतांचा साठा आणि खतांचा साठा उपलब्ध झाला आहे.
त्यापैकी १६.५३ लाख टन खतांची विक्री झाली असून सद्यस्थितीत राज्यात २७.५९ लाख टन खतांचा साठा उपलब्ध आहे. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे उपलब्ध असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
नैसर्गिक मिशनला १९२० कोटींचा निधी
राज्य सरकारच्या २७ जूनच्या शासन निर्णयाद्वारे नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. या उपक्रमाला आता डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन असे नाव देण्यात आले असून या योजनेची व्याप्ती दुसऱ्या टप्प्यात राज्यभर वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेकरिता राज्य व केंद्र सरकारकडून १९२०.९९ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच २३ जूनच्या शासन निर्णयाद्वारे राज्यामध्ये एक रुपयात पीक विमा अर्थात 'सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ होईल, असेही चव्हाण म्हणाले.