Join us

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ७६ % पाऊस, तर पेरण्या ६२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 9:41 AM

राज्यात १ जून ते दि. १७ जुलै या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३८९.१ मिमी असून या खरीप हंगामात दि. १७.०७.२०२३ पर्यंत प्रत्यक्षात २९४. ६० मिमी ( दि. १७.०७.२०२३ जुलै पर्यंतच्या सरासरीच्या ७६% ) एवढा पाऊस पडलेला आहे.

एका बाजूला महाराष्ट्रात अतिवृष्टी व पूरस्थिती, तर दुसऱ्या बाजूला अजूनही काही भाग पावसासाठी तहानलेला. अशा स्थितीत १७ जुलै पर्यंत राज्यात पेरणी आणि पाऊसमानाची काय परिस्थिती आहे, याचा संक्षिप्त आढावा कृषी विभागाने जाहीर केला आहे.

सरासरी पाऊस१ जून ते दि. १७ जुलै या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३८९.१ मिमी असून या खरीप हंगामात दि. १७.०७.२०२३ पर्यंत प्रत्यक्षात २९४. ६० मिमी ( दि. १७.०७.२०२३ जुलै पर्यंतच्या सरासरीच्या ७६% ) एवढा पाऊस पडलेला आहे. १७ जुलै पर्यंत असणाऱ्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत राज्यामध्ये ५२ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के, १३६ तालुक्यामध्ये ५० ते ७५ टक्के तर १०९ तालुक्यांमध्ये ७५ ते १००% पाऊस झालेला असून ५८ तालुक्यांमध्ये १०० टक्के पेक्षा अधिक पर्जन्यमान झालेला आहे.

असे आहे पेरणीचे चित्र खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून दि. १७.०७.२०२३ अखेर प्रत्यक्षात ८८.४४ लाख हेक्टर (६२ टक्के) पेरणी झालेली आहे. सद्यस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. 

कापूस सोयाबीनचे क्षेत्र ८३ टक्केकापूस व सोयाबीन या पिकाचा विचार करता या दोन्ही पिकाखालील असणा-या क्षेत्राच्या तुलनेत सरासरी ८३ टक्के पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीच्या कामास वेग येत आहे. या मध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत.

बियाणे आणि खतांची अशी आहे स्थितीखरीप हंगाम २०२३ करीता १९.२१ लाख क्विं. बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विं. बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १९, २१, ४४५ क्विंटल ( १००%) बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामा करिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेते यांचेकडून बियाणे खरेदी करावे तसेच पावती व टॅग जपून ठेवणे आवश्यक आहे.

खरीप हंगाम २०२३ करिता राज्यास ४३ १३ लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत ४८.३४ लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी २१.३१ लाख मे. टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात २७.०३ लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी. 

टॅग्स :खरीपमोसमी पाऊसपेरणीशेती