- रविंद्र शिऊरकर
दुष्काळाशी दोन हात करत प्रवाही सिंचन असेल किंवा तुषार ठिबक आदींच्या माध्यमातून जेमतेम कपाशी हातात आली. एक वेचणी होत नाही तोच अवकाळी ने कापूस मातीमोल केला. त्यातही हिंमत ठेवत बळीराजाने संघर्ष केला. मात्र, आता फुल ना फुलांची पाकळी म्हणून हातात आलेला दरवर्षी च्या तुलनेत नगण्य असलेला कापूस बाजारभावाच्या कचाट्यात अडकला आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षी असलेल्या दहा हजार रुपये क्विंटल या बाजारभावामुळे होईल तेवढे अधिकाधिक खर्च करून बसलेला शेतकरी या वर्षी मात्र हतबल झाला आहे.
मार्च-एप्रिल मध्ये नांगरणी करून पैशांची जुळवाजुळव करत बळीराजा नवीन हंगामाच्या तयारीत असतो. विविध कंपन्यांचे बियाणे नव्याने बाजारात आलेले असतात, गावाच्या पारावर होणाऱ्या दैनंदिन चर्चेपासून ते नातेवाईकांशी दूरध्वनी वरून झालेल्या बोलण्यातून अमुक एका कंपन्यांचे बियाणे ८०० ते १२०० रूपये किंमतीचे घेतो.
खरिपात संपूर्ण जून महिना या चालू वर्षी दुष्काळात होता. पाठ फिरवलेल्या पावसाचे आगमन ४ जुलै पासून झाले. त्यातही बऱ्याच भागात तो असा काही बरसला की, ज्यामुळे कपाशी पिकासाठी पाडलेल्या सऱ्या पूर्णपणे नाहीशा झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च पुन्हा वाढला, पुन्हा मेहनत वाढली मात्र, हार स्वीकारेल तो शेतकरी कसला. कपाशी लागवड झाली, उतार झाला मात्र पुन्हा एकदा ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये पावसाने पाठ फिरवली. दरम्यान झाडांना माती लावणे, तणनियंत्रणासाठी निंदणी खुरपणी, खते असे विविध खर्च शेतकरी आपापल्या परीने तर काही उसनवारीने करून बसले.
अशा सर्व परिस्थितीशी झुंजत जेमतेम कपाशी या वर्षी सर्वांच्या शेतात उभी राहिली. मजुरांच्या वाढलेल्या मजुरीपुढे घरातील लेकरा बाळांना सोबत घेत कापूस वेचला. दरम्यान, त्यानंतर आलेल्या अवकाळीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. भिजलेला कापूस घरात न ठेवता घेईल त्या व्यापाऱ्याच्या भावात विकावा लागला. मात्र, आता प्रश्न उभा राहिला तो घरात असलेल्या कापसाचा म्हणजेचं पांढऱ्या सोन्याचा.
आमच्याच पिकांना बाजारभाव का नाही?शेतकऱ्यांच्या पिकापासून मानवाच्या अन्न वस्त्र निवारा आदी साठीच्या विविध गरजा पूर्ण होणाऱ्या वस्तू तयार होतात. या सर्वांची दरवर्षी न चुकता दरवाढ होते. सोबत यातून विक्री करणारे व्यापारी, निर्मिती करणारे कारखानदार हे देखील मोठे होत आहेत. मात्र, या सर्वांचं केंद्रस्थान असलेला शेतकरी आणि त्याच्या शेतीमालाची किंमत मूल्य कधीच वाढत नाहीत. आज पासून पाच वर्षे मागे गेलो तरी तेच बाजार भाव आहेत मग अशा परिस्थितीत शेतकरी जगेल की मरेल असा प्रश्न उभा राहतो. - नानाभाऊ जाधव (प्रगतशील शेतकरी शिऊर तथा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते)