राज्यभरातील गळीत हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरूवात झालेली आहे. तर यंदा ३ हजार १५० रूपये प्रतिटन एवढा हमीभाव केंद्र सरकारने उसासाठी जाहीर केला आहे. पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळणारा दर खूप कमी असतो. मागच्या गळीत हंगामात श्रीगोंदा तालुक्यातील साजन साखर कारखान्याने सर्वांत कमी १ हजार ८४० प्रतिटन एवढा दर दिला होता. तर कोल्हापुरातील दालमिया साखर कारखान्याने सर्वांत जास्त म्हणजे ३ हजार १७७ रूपये प्रतिटन एवढा दर दिला होता.
शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपी पेक्षा कमी दर कोणताच कारखाना देऊ शकत नाही. पण जर उसाचा उतारा कमी झाला तर त्यामध्ये बदल होत असतात. उसाच्या सरासरी १०.५ टक्के उताऱ्यात वाढ झाली तर वाढणाऱ्या प्रत्येक ०.१ टक्क्यासाठी ३०.७ रूपये प्रतिटन एवढा वाढीव भाव द्यावा कारखान्याकडून मिळेल. तर उतारा सरासरीपेक्षा कमी झाला प्रत्येक ०.१ टक्के कमी उताऱ्यासाठी ३०.७ रूपये कमी दर मिळणार आहे. उताऱ्यावरून ठरणाऱ्या एफआरपीमधून तोडणी आणि वाहतूक खर्च कपात करून सदर रक्कम शेतकऱ्यांना अदा केली जाते. उताऱ्यानुसार वाढणारा किंवा कमी होणारा दर जरी सगळीकडे सारखा असला तरी तोडणी आणि वाहतूकीचा कपात होणारा दर प्रत्येक कारखान्यांवर अवलंबून असतो.
दरम्यान, जो कारखाना वाहतूक आणि तोडणी खर्च सर्वांत कमी आकारेल त्याच कारखान्याला उस द्या असे आवाहन साखर संकुलाकडून करण्यात आले आहे. अनेकदा काही कारखाने आपल्या क्षेत्रात उस नसल्यामुले दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा विभागातून उसाची आयात करत असतात. अशा वेळी वाहतूक खर्च वाढतो आणि शेतकऱ्यांना मिळणारा दर कमी होतो. तर काही वेळा कारखाना उंचवट्यावर असला तर वाहनांना लागणारे इंधन जास्त लागते आणि त्यानुसार वाहतूकीचा खर्च जास्त आकारला जातो.
तर शेतकऱ्यांनी आपला उस तोडणीच्या आधी आपण ज्या कारखान्याला उस देत आहोत तो कारखाना तोडणी आणि वाहतूक खर्च किती आकारेल याची चौकशी केली पाहिजे. जर हा खर्च वाचवायचा असेल तर शेतकऱ्यांना मालक तोड करूनही उस कारखान्याला पोहोच करता येऊ शकतो. शेतकऱ्याने मालकतोड आणि स्वखर्चाने उस कारखान्याला नेला आणि शासनाने ठरवल्याप्रमाणे उसाचा उतारा आला तर हमीभावाइतका दर मिळणार आहे. त्यामुळे जो कारखाना वाहतूक खर्च आणि तोडणी खर्च कमी आकारेल त्याच कारखान्याला उस दिला पाहिजे.
सर्वांत जास्त आणि सर्वांत कमी तोडणी, वाहतूक खर्च आकारणारे कारखाने
मागच्या वर्षी कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील रिलाएबल शुगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील साजन साखर कारखान्याने अनुक्रमे १२१८ आणि ११४६ रूपये प्रतिटन एवढा तोडणी आणि वाहतूक खर्च वजा केला होता. तर धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याने सर्वांत कमी म्हणजे ५५० रूपये प्रतिटन एवढा तोडणी आणि वाहतूक खर्च वजा केला आहे.