Join us

६७६ लाख टनाचे ऊस गाळप करून ६५ लाख टन साखरेचे उत्पादन घेत महाराष्ट्र देशात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 3:10 PM

जानेवारी महिना अखेर देश पातळीवरील एकूण ५१७ कारखान्यांमधून १९२८ लाख टन ऊस गाळप झाले असून त्यातून सरासरी ९.७१ टक्के उताऱ्यासह १८७ लाख टनाचे नवे साखर उत्पादन झाले आहे.

नवी दिल्ली : जानेवारी महिना अखेर देश पातळीवरील एकूण ५१७ कारखान्यांमधून १९२८ लाख टन ऊस गाळप झाले असून त्यातून सरासरी ९.७१ टक्के उताऱ्यासह १८७ लाख टनाचे नवे साखर उत्पादन झाले आहे असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष श्री. जयप्रकाश दांडेगावकर यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्नाटक राज्यातील पाच आणि गुजरातेतील एक अशा एकूण सहा कारखान्यांनी आपला गाळप हंगाम आटोपला आहे.

देश पातळीवरील ऊस गाळपात अग्रक्रम राखलेल्या महाराष्ट्राने ६७६ लाख टनाचे गाळप केले असून त्यातून सरासरी ९.६० टक्के उताऱ्यासह ६५ लाख टनाचे नवे साखर उत्पादन केले आहे. या गतीने महाराष्ट्रातील हंगाम मार्च अखेर ते एप्रिल मध्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे.

दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश मधील ऊस गाळप ५७४ लाख टन झाले असून त्यातून सरासरी १०.५ टक्के उताऱ्यासह ५७.६५ लाख टन नवे साखर उत्पादन तयार झाले आहे. उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम एप्रिल अखेर ते मे मध्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे.

तृतीय क्रमांकावरील कर्नाटक राज्यातील ३७७ लाख टन ऊस गाळपातून सरासरी ९.७५ टक्के उताऱ्यासह जवळपास ३७ लाख टन नवे साखर उत्पादन झाले आहे.

उर्वरित सर्व राज्यातील होणारे ऊस गाळप, सरासरी साखर उतारा आणि होणारे नवे साखर उत्पादन लक्षात घेता यंदाच्या वर्षीच्या हंगाम अखेर देश पातळीवरील नवे साखर उत्पादन ३१४ लाख टनाचे होणे अपेक्षित आहे. परतीचा पाऊस तसेच इथेनॉल निर्मितीकडे वळणाऱ्या साखरेवरील आणलेले निर्बंध यामुळे नव्या साखर उत्पादनात वाढ होताना दिसत आहे.

जरी हे अपेक्षित साखर उत्पादन गतवर्षीच्या ३३१ लाख टन उत्पादनाच्या  तुलनेत १७ लाख टनाने  कमी असले तरी  देशातील साखर उत्पादनाचा ताळेबंद पाहता वर्ष अखेर ७५ ते ८० लाख टन साखर शिल्लक राहणे अपेक्षित आहे. आणि ही च नेमकी बाब आम्ही राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे केंद्र शासनातील संबंधित मंत्रालयाच्या नजरेस आणली असून आणखी किमान १५ लाख टन साखरेचा इथेनॉल निर्मितीकडे वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे जेणेकरून कारखान्यात तयार होऊन पडून असलेल्या बी हेवी मळीचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर होऊन आसवांनी समोर उभ्या ठाकलेल्या आर्थिक समस्येवर तोडगा निघू शकेल. - श्री. जयप्रकाश दांडेगावकर अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीमहाराष्ट्रकर्नाटकउत्तर प्रदेशगुजरात