पुणे: सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रामध्ये चांगलीच थंडी वाढली आहे. राज्यात अनेक भागात कडाक्याची थंडी पडत असल्याने हुडहुडी भरत आहे. शुक्रवारी (दि.२२) निफाड येथे सर्वात कमी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यातील तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी (दि.२२) पुण्यात १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
देशामध्ये उत्तरेकडे थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तसेच भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान असलेल्या कोमोरिन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
हरियाणातील हिस्सार आणि राजस्थानमधील सिकर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यातही गारठा वाढत आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशापेक्षा खाली नोंदवले आहे.
राज्यातील किमान तापमानाची नोंद अशी
पुणे : १२.६
नगर : १२.३
जळगाव : १३.२
कोल्हापूर : १७.३
महाबळेश्वर : १४
नाशिक : १२.४
सातारा : १३.७
सोलापूर : १७.४
मुंबई : २२.८
परभणी : १५
गोंदिया : १२.८
नागपूर : १५