गल्लेबोरगाव परिसरातील शेतकरी शेतीबरोबरच दरवर्षी वृक्ष लागवड करतात. त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान देय असते. मात्र, आता महोगनी वृक्षाची लागवड शेतकऱ्यांना किफायतशीर ठरणार आहे.
या वृक्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा जणू मार्गच मिळाला आहे. या झाडापासून १२ वर्षांनंतर शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळते. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगावमध्ये ४५ शेतकऱ्यांनी ६५ एकर क्षेत्रावर महोगणीची लागवड केली आहे.
आंबां, मोसंबीसह महोगनीचीही लागवडू
शेतात लागवड करताना बहुतेक शेतकरी साग, आंबा, मोसंबी, बांबू आणि पेरू अशा झाडांची लागवड करतात; परंतु, या झाडांच्या व्यतिरिक्त काही फळझाडे आणि इतर वृक्ष असे आहेत की, त्यापासून शेतकऱ्यांना झाड लावल्यानंतर १२ ते १३ वर्षांनंतर लाखाच्या पटीत उत्पन्न मिळते. यामध्ये महोगणी वृक्षाचा समावेश होतो.
गल्लेबोरगाव येथील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी महोगणी वृक्षांची लागवड केली आहे. यासाठी येथील शेतकऱ्यांना खुलताबाद पं. स.चे कर्मचारी नितीन बवारे, सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच संतोष राजपूत, चेअरमन तुकाराम हारदे, गणेश खोसरे, बाळासाहेब भोसले हे मार्गदर्शन करीत आहेत. शेतकऱ्यांना रोपे पुणे येथील महोगणी विश्व अॅग्रो यांनी पुरविली आहेत.
बारा वर्षांत वाढते ८० फुटांपर्यंत
महोगनी वृक्षाची लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला १ झाड १२ वर्षांनंतर उत्पन्न मिळवून देते. १२ वर्षांत हे झाड सुमारे ६० ते ८० फूट सरळ वाढते. याच्या वाढीसाठी नैसर्गिक किंवा सेंद्रिय खताची आवश्यकता असते. या वृक्षाला परिपूर्ण होण्यासाठी एक किंवा अधिक वर्ष लागतात. १२ ते ४८ सेल्सिअस तापमानात हे झाड जगू शकते. त्यानंतर ७०० ते २००० मि.मी. पावसातसुद्धा झाड जगते. १२ वर्षात एक मीटरपर्यंत खोडाच्या परिघाची वाढ होते.
विविध उपयोग
महोगनीचे लाकूड कठीण असून, यावर पाणी किंवा किड्यांचा परिणाम होत नाही. यापासून संगीत वाद्य, कागद, नक्षीदार तावदान, आतील ट्रिम, तसेच फर्निचर यासाठी उपयोग केला जातो.
याशिवाय फळे, पाने आणि फांद्यांचे अर्क हे औषधी असून, कर्करोग, मलेरिया, रक्त्तक्षय, अतिसार आणि मधुमेह या रोगांवरील औषधांसाठी क्षेत्रात वापर केला जातो.त्यामुळे महोगनी वृक्षाची लागवड शेतकऱ्यांना अधिक किफायतशीर ठरणार आहे. महोगनी वृक्षलागवड केल्यास शेतकरी भविष्यात आर्थिक सक्षम बनू शकतो, असे गल्लेबोरगाव येथील गणेश खोसरे, बाळासाहेब भोसले यांनी सांगितले.