Join us

सततच्या पावसामुळे मक्याला कोंब फुटले, शेतकऱ्याचे लाखाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 1:36 PM

Maize Issue: परतीच्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी काढणी केलेल्या मक्याच्या कणसांना कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव  तालुक्यातील कोठली येथील ज्ञानेश्वर उत्तम पाटील या शेतकऱ्याने मक्याची कणसे तोडून व चारा कापून शेतात ठेवला होता. मात्र, सततच्या पावसाने कणसांना हिरवे कोंब फुटून नुकसान झाले आहे, चाराही खराब झाला आहे.

ज्ञानेश्वर पाटील यांचे शेत कोठली शिवारात कोठली फाट्याच्या वळणावरील गट नं. २०४ क्षेत्रात आहे. दोन एकर मका पीक त्यांनी लावले होते. दि. १५ रोजीपासून मका कणसे तोडली व चारा कापून जमिनीवर पडला होता. कणसे जमिनीवर पडली होती. परतीच्या पावसाने उघडीप न दिल्याने कणसे जमा करता आली नाहीत, त्यामुळे त्यांना हिरवे कोंब फुटून नुकसान झाले आहे. ढीग केलेल्या कणसांनाही कोंब फुटले. चाऱ्याचे नुकसान झाले.

ड्रेनेजमुळे शेतात पाणी.. कोठली फाटा ते कोठली गावापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले; परंतु रस्त्यालगत ड्रेनेजचे काम न झाल्याने सर्वच शेती पिकांमध्ये पाणी साचताना दिसत आहे. ठेकेदाराने रस्त्यालगत ड्रेनेज काढून पाण्याची विल्हेवाट लावावी. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मका पिकाचे २ एकर क्षेत्राचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. पिकाचा विमा काढला आहे, नुकसानीची तक्रार नोंदविण्यात ॲपवर अडचणी येत आहेत. कृषी विभागाला कळवूनही नुकसानीचा पंचनामा झालेला नाही. पंचनामा करून तत्काळ आर्थिक मदत मिळावी. - ज्ञानेश्वर पाटील, शेतकरी

टॅग्स :मकामोसमी पाऊसपाऊसखरीप