रब्बी हंगामात भुईमूग किंवा अन्य भाज्यांमध्ये आंतरपीक म्हणून मका लागवड फायदेशीर ठरत आहे. गोड, अधिक दाण्याची कणसे भाजून, उकडून खाल्ली जातात. त्यापासून कॉर्न सूप, कटलेट, वडा, उपमा, भजी, खीर, दाण्याची उसळ, हलवा इत्यादी खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. कणसे काढून झाल्यानंतर सकस अशी हिरवी वैरण दुभत्या जनावरांसाठी उपलब्ध होत आहे. आंतरपिक लागवडीमुळे अधिक फायदेशीर होत आहे.
मका हे पीक उष्ण हवामानास चांगला प्रतिसाद देते. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी २० ते ३२ सेल्सियस तापमान योग्य आहे. रात्रीचे तापमान जास्त काळ १५ सेल्सियसच्या खाली गेल्यास मक्याच्या वाढीवर परिणाम होतो. तापमान १० सेल्सियसच्या खाली गेल्यास मका बियाण्याच्या उगवण क्षमतेवर अनिष्ट परिणाम होऊन उगवण नीट होत नाही. मका लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम काळी किंवा जांभ्या दगडापासून तयार झालेली सुपीक जमीन योग्य आहे. जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा, चोपण किंवा जास्त दलदलीच्या जमिनीत मक्याचे पीक घेऊ नये.
रब्बी हंगामात नोव्हेंबरमध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी टोकन पद्धतीने जमिनीच्या मगदुरानुसार ६० सेंटिमीटर बाय २० सेंटिमीटर अंतरावर करावी. एका ठिकाणी दोन दाणे ४-५ सें.मी खोलीवर पेरावे, उगवणी नंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करून प्रत्येक ठिकाणी निरोगी, जोमदार असे एक रोप ठेवावे, पेरणीसाठी हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया ३ ग्रॅम कॅप्टॉन प्रति किलो बियाणे प्रमाणे करावी. त्यानंतर २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे करावी. त्यानंतर २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक चोळावे, त्यामुळे उत्पादनात ५ ते १० टक्के वाढ होते.
मधुमक्याची शुगर ७५ ही जात कोकणातील हवामानासाठी योग्य असल्याचे आढळले आहे. सुमधूर व अतिमधुर या जाती भुईमुगामध्ये आंतरपीक म्हणून घेण्यास योग्य आहेत. याशिवाय माधुरी, सचरेता या जातीही चांगल्या आहेत. मधुमका पिकास हेक्टरी १० टन शेणखत पेरणीपूर्वी कुळवाच्या सहाय्याने जमिनीत मिसळून घ्यावे. पिकास प्रतिहेक्टरी २०० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ६० किलो पालाश या खताची मात्रा द्यावी. हेक्टरी १५० ते १६० क्विंटल कणसाचे उत्पादन मिळते.