महाराष्ट्रात रब्बी हंगामापेक्षा खरिपात मका पिकाची मोठी लागवड होते. काही पिकांमध्ये मिश्र पिक म्हणूनही मक्याची लागवड होते. मिश्र पिक पद्धतीमुळे जनावरांना हिरवा चारा आणि खाण्यासाठी कोवळी कणसे उपलब्ध होतात तसेच धान्य उत्पादनही मिळते.
सर्व तृण धान्य पिकाशी तुलना करता मका हे पिक निरनिराळ्या हवामानाशी समरस होवून त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते. अन्नधान्या व्यतरिक्त मक्याचा उपयोग लाहया, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, ग्लुकोस इत्यादी विविध पदार्थ तयार करण्याकरीता होतो.
जमीन : मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन लागवडीस योग्य असते. जमीनीचा सामु ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.
हवामान : मका हे पिक उष्ण, समशीतोष्ण आणि शीत अशा वेगवेगळया हवामानाशी समरस होणारे पिक आहे. मक्याची योग्य वाढ आणि विकासासाठी २५ ते ३० अंश सेल्सीअस तापमान आवश्यक असते. तापमान ३५ अंश सेल्शीअस पेक्षा अधिक असल्यास उत्पादनात घट येते.
बियाणे प्रमाण : धान्यासाठी च्या मका पेरणीकरीता १५ ते २० किलो बियाणे तर चाऱ्यासाठीच्या मका पिकाकरीता ७५ किलो बियाणे एक हेक्टर क्षेत्रास पुरेसे होते.
पेरणीची योग्य वेळ : पेरणी १५ जून ते १५ जुलै दरम्यान पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर लगेचच करावी. पेरणी उशिरा झाल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.
बिजप्रक्रिया : (प्रमाण प्रती किलो बियाणे) सायॲन्ट्रानिलोप्रोल (१९.८%) अधिक थायामेथोक्झाम (१९.८% एफ. एस) ६ मिली या बिजप्रक्रीयामुळे पेरणीनंतर १५ ते २० दिवसापर्यंत पिकाचे अमेरिकन लष्करी अळीपासून संरक्षण होते. बियाणे खरेदी करतांना त्याला कोणती बीजप्रक्रिया केली आहे का ते पाहावे व त्यानुसार सल्ला घेवून कृती करावी. थायरम २ ग्रॅम तसेच अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.
पेरणीची पद्धत : मक्याची पेरणी टोकन पद्धतीने ४ ते ५ से. मी. खोलीवर करावी. पेरणीचे अंतर ७५ X २० से. मी. उशिरा व मध्यम वाणासाठी व ६० X २० से. मी. लवकर पक्व होणाऱ्या वाणासाठी हे योग्य अंतर ठेवून हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखावी.
मका पिकाचे प्रकार : मका पिकाचे खालीलप्रमाणे विविध प्रकार आहेत व प्रकारानुसार त्याचे विविध वाण आहेत.
अ.क्र. | मक्याचे प्रकार | उपयोग | वापर |
१ | साधा मका | पिवळा, तांबडा, पांढरा मका | अन्नधान्य, पशुखाद्य, पोल्ट्रीखाद्य, मुल्यवर्धीत पदार्थ |
२ | चाऱ्यासाठी मका | हिरवा चारा व मुरघास बनविणे | पशुखाद्य |
३ | स्विट कॉर्न मका | कणसे उकडून भाजून खाण्यासाठी | अन्नधान्य |
४ | पॉप कॉर्न मका | लाहयासाठी | मुल्यवर्धीत खाद्यपदार्थ |
५ | बेबी कॉर्न मका | सुप, लोणचे, भजी | पंचतारांकित हॉटेल |
खत व्यवस्थापन : पेरणीवेळी स्फुरद आणि पालाश खताची संपुर्ण मात्रा आणि नत्राची मात्रा ३ समान हफ्त्यात विभागून द्यावी. झिंक ची कमतरता असल्यास हेक्टरी २० ते २५ किलो झिंक सल्फेट पेरणीवेळी द्यावे. पेरणीच्यावेळी रासायनिक खताची मात्रा नत्र (युरिया) ४० (८८), स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट) ६० (३७८) व पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश) ४० (६८) हि अन्नद्रव्य किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात द्यावी व पेरणीनंतर ३० दिवसांनी नत्र ४० (८८ किलो युरिया व लगेचच ४० ते ४५ दिवसांनी पेरणीनंतर ४० (८८ किलो युरिया द्यावा)
पेरणीनंतर घ्यावयाची काळजी : पेरणीनंतर सुरूवातीचे १० ते १२ दिवस शेताची राखण करावी. पीक उगवत असतांना आलेले कोवळे कोंब पक्षी टिपून खातात. मका उगवनीनंतर ८ ते १० दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच जोमदार रोप ठेवून विरळणी करावी व गरजेनूसार नांग्या भरून घ्याव्यात.
सुधारीत जातीची निवड :
अ.क्र. | जातीचे नाव | कालावधी (दिवस) | धान्य सरासरी उत्पादन (क्विंटल प्रती हेक्टरी) |
१ | राजर्षी | ९० ते १०० | ७० ते ७५ |
२ | फूल महर्षी | ९० ते १०० | ७५ ते ८० |
३ | संगम | १०० ते ११० | ७५ ते ८० |
४ | कुबेर | १०० ते ११० | ७५ ते ८० |
५ | बायो - ९६८१ | १०० ते ११० | ६० ते ७० |
६ | एचक्युपीएम - १ | १०० ते ११० | ६० ते ६५ |
७ | महाराजा | ८० ते ९० | ६० ते ६५ |
८ | विवेक संकरीत मका - २७ | ७० ते ८० | ५० ते ५५ |
९ | आफ्रिकन टॉल | १०० ते ११० | ६० ते ७० टन हिरवा चारा (४० ते ५० क्विंटल/धान्य) |
१० | फुले मधु | ८० ते ८५ | १२५ ते १३० हिरवी कणसे क्वि./हेक्टर |
तण नियंत्रण : पेरणी पुर्ण होताच अॅट्राझीन (५०%) हेक्टरी २ ते २.५ किलो याप्रमाणे ५०० लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमीनीवर फवारावे. फवारणी करतांना जमीनीत ओलावा असणे गरजेचे आहे.
आंतरपिके : खरिप हंगामात मध्य महाराष्ट्र पठारी भागात मका + भुईमुग, मका + सोयाबीन, मका + चवळी या आंतरपीक पद्धतीत ६:३ ओळी याप्रमाणात घेणे फायदेशिर आहे.
काढणी व साठवणुक : धान्यासाठी मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि टणक झाल्यावर करावी त्यासाठी ताटे न कापता प्रथम कणसे सोलुन खुडून घ्यावीत आणि सोललेली कणसे २ ते ३ दिवस उन्हात चांगली वाळवावीत त्यानंतर मका सोलणी यंत्राच्या मदतीने सोलणी करावी व नंतर दाण्यातील ओलावा १० ते १२ टक्के होईपर्यंत दाणे उन्हात चांगले वाळवावे.
लेखक
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक (कृषी विद्या विभाग)
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर पिन कोड ४२३७०३, मो.नं. ७८८८२९७८५९
हेही वाचा - Goat Farming अवकाळी संकटाच्या शेतीला देईल आधार; शेळी पालन हक्काचा रोजगार