सध्या सर्वत्र मका खरेदी करताना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यातच आता वैजापुर बाजार समितीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. यात व्यापारी आर्द्रता मशीनऐवजी दाता खाली मका दाणा फोडून त्यावरून आर्द्रता तपासून मका खरेदी करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर परिसरात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मका खरेदी केंद्रावर आवक अधिक प्रमाणात असते. खरेदी करताना आर्द्रता तपासणी करून खरेदी करणे बंधनकारक असताना, बाजार समितीत मात्र या अजब गजब शोधामुळे व्यापारी दाता खाली मका दाणा फोडून आर्द्रता तपासून मका खरेदी करत आहेत. यामुळे दरात तफावत निर्माण होत असल्याचे शेतकरी बोलताना दिसत आहेत.
तसेच या बाजार समितीत विविध ठिकाणी फलक लाऊन दर्शविण्यात आलेले आहे की, व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदी केल्यानंतर त्वरित रोख स्वरूपात रक्कम देणे बंधनकारक आहे. मात्र असे असतांनाही या बाजार समितीत प्रत्यक्षात ठराविक १०-१५% रक्कम रोख देण्यात येते आणि बाकी रक्कम आठ ते पंधरा दिवसांच्या वायद्याने दिली जाते.
या सर्व विषयी लोकमत अॅग्रोने जेव्हा खात्री करून वैजापुर बाजार समितीच्या सचिवांची भेट घेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी अधिकृत माहिती देण्यास नकार देत असे सांगितले की, व्यापाऱ्यांना काही वर्षांचा अनुभव असल्याने त्या अनुभवाच्या आधारे व्यापारी दाता खाली ठेवून आर्द्रतेचा अंदाज बांधून मका खरेदी करतात.