Join us

मका, ज्वारीचा पेरा कमी! पाण्याबरोबरच चाऱ्याची भासणार भीषण टंचाई

By दत्ता लवांडे | Published: December 26, 2023 4:51 PM

राज्यातील रब्बी हंगामाचा पीक पेरा किती?

यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असून राज्यातील ४० तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. त्याचबरोबर यंदा चारा आणि पाण्याची टंचाई भासणार असून उन्हाळ्यात याच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागणार आहेत. चारा पिकासाठी उपयुक्त असलेले मका आणि ज्वारी हे प्रमुख पिकांचा पेरा कमी झाल्याचं महाराष्ट्र शासनाच्या अलीकडील पीकपेरा अहवालानुसार स्पष्ट झालं आहे. 

दरम्यान, राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची ज्वारी आणि मक्याची पेरणी झाली असून ज्वारी ही पोटऱ्यात आली आहे. त्यामुळे इथून पुढे लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता कमी आहे. रब्बी हंगामातील मुख्य पिकांचा विचार केला तर २२ डिसेंबर रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार ५३ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी केवळ ४५ लाख २५ हजार हेक्टरवर लागवड अथवा पेरणी झाली आहे. मागच्या पाच वर्षाच्या पिकांच्या पेऱ्याचा विचार केला तर यंदा केवळ ८३ टक्के रब्बी पिकांची लागवड झाली आहे. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत ९२ टक्के लागवड झाली आहे. 

मका आणि ज्वारीचा पेरा कमीच

चारा पिकासाठी मुख्य समजल्या जाणाऱ्या मका आणि ज्वारी पीक विचारात घेतले तर रब्बी ज्वारीसाठी प्रस्तावित असलेल्या १७ लाख ५३ हजार हेक्टरपैकी केवळ १२ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजे सरासरीच्या ७४ टक्के लागवड झाली आहे. मागच्या वर्षीच्या ज्वारीच्या क्षेत्रापेक्षा यंदाचे ज्वारीचे क्षेत्र अधिक असले तरी सरासरीने कमीच आहे. तर मक्यासाठी प्रस्तावित असलेल्या २ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी केवळ २ लाख २५ हजार हेक्टरवर मक्याची लागवड करण्यात आली आहे. म्हणजे प्रस्तावित क्षेत्रांपैकी ८७ टक्केच क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे.

भासणार चाऱ्याची टंचाई

यंदाची दुष्काळसदृश्य परिस्थिली लक्षात घेता राज्य सरकारने चारा पिकासाठी जास्त क्षेत्र प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतला होता. पण ज्वारी आणि मक्याच्या लागवडीमध्ये घट झाल्याने यंदा चारा टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर पाण्याची कमतरता भासल्याने उत्पादनही कमी होणार असून या झळा शेतकऱ्यांना आणि परिणामी सरकारला सहन कराव्या लागतील. त्यामुळे आत्ताच विशेष उपाययोजना करणे गरजेचे आहे.  

रब्बी हंगामाचा पेरा किती?

पीक - मागील पाच वर्षाचे सरासरी क्षेत्र -मागील वर्षाचे पेरणी क्षेत्र - यंदाचे पेरणी क्षेत्र - मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदाच्या पेरणी क्षेत्राशी टक्केवारी (क्षेत्र हेक्टरमध्ये)रब्बी ज्वारी - १७ लाख ५३ हजार ११८ - ११ लाख ९९ हजार ५३० -  १२ लाख ९९ हजार ९४० - ७४.१५ टक्केगहू - १० लाख ४८ हजार ८०७ - ७ लाख ९० हजार ८३७ - ६ लाख ७३ हजार १०६ - ६४.१८ टक्केमका - २ लाख ५८ हजार ३२१ - २ लाख ६४ हजार २५० - २ लाख २५ हजार ६९८ - ८७.३७ टक्केहरभरा - २१ लाख ५२ हजार ०१४ - २४ लाख ७६ हजार ४०५ - २१ लाख ८८ हजार ३२९ - १०१.६९ टक्केएकूण रब्बी कडधान्ये -  २२ लाख ६९ हजार ७६८ - २५ लाख ८१ हजार ७४३ - २२ लाख ७० हजार ५२२ - १००.०३ टक्के एकूण रब्बी अन्नधान्ये - ५३ लाख ४१ हजार ३१० - ४८ लाख ४२ हजार ७१३ - ४४ लाख ७५ हजार २९७ - ८३.७९ टक्केइतर रब्बी तृणधान्ये (बाजरी, ओट, बार्ली इतर) - ११ हजार २९६ - ६ हजार ३५४ - ६ हजार ३० - ५३.३८ टक्केएकूण रब्बी तेलबिया - ५५ हजार ६६० - ४४ हजार ६५३ - ५० हजार ६१२ - ९०.९३ टक्के

राज्यातील एकूण पिकाखालील पेरणी क्षेत्र - ५३ लाख ९६ हजार ९६९ - ४८ लाख ८७ हजार ३६६ - ४५ लाख २५ हजार ९०९ - ८३.८६ टक्के

पीक पेरणी अहवाल

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीरब्बी