मका हे पीक महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा आणि सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. अलीकडेच या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. यामुळे मका पिकास वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे.
जीवनक्रम:या किडीची एक पिढी उन्हाळ्यात ३० दिवसात पूर्ण होते तर हिवाळ्यात या किडीचा कालावधी ६० दिवस आढळून आला आहे. एका वर्षात ३ ते ४ पिढ्या विविध वनस्पतीवर पूर्ण होऊ शकतात. पतंगांची संख्या एप्रिल ते डिसेंबर भरपूर प्रमाणात आढळते.
अंडी:अंडी पुंजक्याने पानावर घातली जातात. एका पुंजक्यात १०० ते २०० अंडी आढळतात. एक मादी तिच्या जीवनकाळात सरासरी १५०० ते २००० अंडी घालू शकते.
अळी:पूर्ण वाढ झालेली अळीचे तोंडावर पांढरया रंगाचे उलट्या वाय (Y) आकाराचे चिन्ह दिसते. तसेच पाठीवरील प्रत्येक कप्यावर ४ पांढरे ठिपके असतात आठव्या किंवा नवव्या कप्प्यावर हे ठिपके असून चौरस असतात. अळीच्या वाढीच्या सहा अवस्था असतात. उन्हाळ्यात अळी अवस्था १४ तर हिवाळ्यात ३० दिवस असू शकते.
नुकसानीचा प्रकार:अंड्यातून बाहेर पडताच अळ्या पानांचा हिरवा पापुद्र खातात. त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे आढळून येतात. दुसरया व तिसरया अवस्थेतील अळ्या पानांना छिद्रे करतात व पानांच्या कडा खातात. अळी कणसाला छिद्र करून दाणेही खाते.
एकात्मिक व्यवस्थापन:
मशागत पध्दत: - उन्हाळ्यात खोल नांगरत करावी.- पिक फेर पालट करावी मका घेतलेल्या पिकात भुईमुग अथवा सुर्यफुल पिक घ्यावे.- सापळा पीक म्हणून मक्याचे बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी.- मक्यात तूर उडीद तसेच मुग या पिकांना आंतरपीक म्हणून लागवड करावी.
भौतिक पध्दत:- मका पेरणी नंतर एकरी १० ते १२ पक्षी थांबे उभारावेत.- मका पानांवरील अंडीपुंज व नवजात अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.- कीड सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत.- तसेच मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी एकरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत.
जैविक पध्दत:- मका पिकात १५०० पी.पी.एम. अॅझाडीरॅक्टीन ५ मिली सुरवातीचे वाढीचे अवस्थेत फवारावे.- प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक मेटारायझियम (नोमुरीया) रीलेई किंवा मेटारायझियम अनिसोपली ५ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.- ट्रायकोग्रामा बॅक्टरी (ट्रायको कार्ड) १.५ लाख अंडी हेक्टरी सोडावेत.
रासायनिक पध्दत:- पोंगा व्यवस्थित तयार होताच त्यात माती किंवा बारीक वाळू किंवा राख + चुना यांचे ९:१ या प्रमाणात त्यात टाकावे.- थायोमेथोझ्याम १२.६ % सी.जी.+ लॅबडा सायहॅलोथ्रीन ९.५ % झेड. सी. (अलिका, जोश, अलर्ट, हकुरा इ.) ५ मि.लि. किवा स्पिनोटोरॅम ११.७ % एस.सी. (डेलिगेट, लारगो इ.) ४ मि.लि. किंवा क्लोरोनट्रॅनीलप्रोल १८.५ % एस.सी. ४ मि.लि. या किटकनाशकांची आलटून पालटून गरजेप्रमाणे फवारणी करावी.
प्रा. भालचंद्र मधुकर म्हस्केसहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र डॉ. सुरेश दोडके, गहू विशेषज्ञ , कृषी संशोधन केंद्र, निफाड