खानापूर : खानापूर घाटमाथ्यावर मका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मका काढण्यासाठी मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे मका काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून पहिल्यांदाच यंत्राचा वापर होऊ लागला आहे.
घाटमाथ्यावर आलेल्या टेंभूच्या पाण्यामुळे व परिसरात या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे बागायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे.
खरिपात लागवड केलेला मका आता काढणीला आला आहे; परंतु शेतातील कामासाठी मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या वर्षी पहिल्यांदाच मका काढण्यासाठी यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
हे यंत्र मक्याची काढणी व मळणी करत असल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे यंत्र फायदेशीर ठरू लागले आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी या यंत्राची घरघर ऐकायला येत आहे.
या वर्षी मुबलक पाणी असल्याने मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र काढणीसाठी मजूरच मिळत नसल्याने काढणीसाठी मका यंत्राचा वापर केला आहे. यामुळे वेळ व त्रास वाचत असल्याने हे यंत्र फायदेशीर ठरत आहे. - अन्नू माने, शेतकरी, खानापूर